अल्कारेझ, मेदवेदेव, झ्वेरेव उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने कारकिर्दीत तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचबरोबर डॅनियल मेदवेदेव व अलेक्झांडर झ्वेरेव यानेही अंतिम आठमधील आपले स्थान पक्के केले.

‘नंबर वन’ टेनिसपटू कार्लोस अल्कारेझने इटलीच्या माटेओ अर्नाल्डीचा 6-3, 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत आगेकूच केली. त्याने 1 तास 59 मिनिटांत ही लढत जिंकून आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. 2021 पासून अल्कारेज सातत्याने या स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये पोहोचलाय. गतवर्षी त्याने किताबी लढतीत कॅस्पर रुडचा पाडाव करीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. आता हे जेतेपद राखण्यासाठी तो सर्वस्व पणाला लावताना दिसत आहे, मात्र त्याच्या मार्गात नोवाक जोकोविचचा अडथळा असणार आहे. दुसरीकडे तृतीय मानांकित रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने 13व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स डी मिनॉरचा चुरशीच्या लढतीत 2-6, 6-4, 6-1, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. ही लढत 2 तास 40 मिनिटांपर्यंत रंगली. याचबरोबर 12व्या मानांकित रशियाच्या अलेक्झांडर ज्वेरेवने सहाव्या मानांकित इटलीच्या जननिक सिनरचा 6-4, 3-6, 6-2, 4-6, 6-3 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही मॅरेथॉन लढत तब्बल 4 तास 41 मिनिटांपर्यंत रंगली.

सबालेंका, वॉण्ड्रोसोवा, किझ यांची घोडदौड

महिला एकेरीत द्वितीय मानांकित बेलारूसची एरिना सबालेंका, झेक प्रजासत्ताकची मार्केटा वॉण्ड्रोसोवा व यजमान अमेरिकेची मॅडिसन किझ यांनीही अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सबालेंकाने रशियाची डारिया कसातकिना हिचा 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविला. वोंदरोसोवा हिने अमेरिकेच्या पेटॉन स्टर्नस हिचा 6-7(3/7), 6-3, 6-2 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मॅडसिन किझने आपलीच देशसहकारी असलेल्या तृतीय मानांकित जेसिका पेगुला हिचा 6-1, 6-3 असा सहज पाडाव करीत आपली घोडदौड सुरूच ठेवली.