शाळेच्या बसची धडक लागून 14 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परिसरात वैजापूर रस्त्यावरील एका स्कूलबसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 14 वर्षाची शाळकरी मुलगी ठार झाली. या घटनेमुळे पढेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शाळेच्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोमल नारायण पगारे असे अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. कोमल पढेगाव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होती. सोमवारी, 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सायकलवर आपल्या भावासमवेत शाळेत जात असताना पढेगाव-वैजापूर रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसने तिला जोराची धडक दिली. अपघातस्थळी ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र थोड्याच वेळात तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ ऋत्विक नारायण पगारे यालाही डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोमलच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून तिच्या शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कोमलला श्रद्धांजली अर्पण करून विद्यालयाला सुट्टी देऊन दिवसभर शोक पाळला. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेची बस आणि चालकाला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.