उद्घाटनासाठी आमंत्रणच नाही, राम मंदिर आंदोलनात जखमी झालेल्या कारसेवकाने मांडली व्यथा

अयोध्येत राम मंदिर उभे राहावे यासाठी डिसेंबर 1992 साली देशभरातून मोठ्या संख्येने कारसेवक अयोध्येत गेले होते. या कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला ज्यानंतर राम मंदिरासाठीचे आंदोलन खऱ्या अर्थाने सुरू झाले होते. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र या उद्घाटनाला ज्या कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला त्यांना निमंत्रणच नसल्याने ते नाराज झाले आहेत.

अचल सिंह मीणा हे बाबरी पडली तेव्हा घुमटावर चढले होते. घुमट पडला आणि त्यासोबत मीणाही खाली पडले होते. मीणा यांच्या अंगावर ढिगारा पडल्यामुळे ते जबर जखणी झाले होते. या घटनेनंतर त्यांच्या कमरेखालचा भाग निकामी झाला आहे. ही घटना झाली तेव्हा मीणा हे 30 वर्षांचे होते.

मीणा यांना जखमी झाल्यानंतर पहिल्या फैजाबादमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नखनऊ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीणा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना आपण कायमचे जायबंदी झाल्याचे कळाले होते. इतकं सगळं सोसल्यानंतरही राम मंदिरासाठी आमंत्रण न मिळाल्याचे दु:ख मीणा यांना आहे. त्यांनी थेट प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की 22 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सामील केले जावे आणि त्यांना दर्शन घेण्याची परवानगी मिळावी.

मीणा यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. ते भोपाळजवळच्या एका गावामध्ये राहतात. राम मंदिराच्या उद्घाटनाची बातमी जेव्हा त्यांना कळाली तेव्हा त्यांना फार आनंद झाला होता. मात्र ज्या कारणासाठी आपण लढलो होतो ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तिथे बोलावण्यातही न आल्याचा त्यांना खेद वाटतो आहे.