जालना येथील घटनेच्या निषेधार्थ नगरमध्ये शिवसेनेची निदर्शने

जालना येथे मराठा समाजावर बेछूटपणे लाठी चार्ज करण्यात आला. त्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, विजय पठारे, दीपक खेरे,संतोष गेनपा, शिवाजी कदम,आशा निंबाळकर, गौरव ढोणे, श्रीकांत चेमटे, संदीप दातरंगे, प्रताप गडाख, अनिकेत गवळी, अरुण झेंडे, मुना भिगारदिवे, सुनील सुडके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, या राज्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. काल जी घटना घडली त्यामध्ये ते मराठा समाजचे आंदोलनकर्ते शांतपणे आपले आंदोलन करत होते. परंतु या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. शेवटी आंदोलन मागे घेण्यासाठी या सरकारने बळाचा वापर करत अमानुषपणे लाठी चार्ज केला व त्याचे पडसाद आज संपूर्ण राज्यात उमटले आहेत. यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली आहे.

यावेळी मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.