वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर, यवतमाळमध्ये गाढवांची मागणी वाढली

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या तीरावर वसलेले धनोडा गावात वाळूची तस्करी दिवसाढवळ्या सुरू असून, मोठमोठाले ट्रक , लॉरी वापरण्याऐवजी तस्करांनी गाढवं वापरायला सुरुवात केली आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात गाढवांना अचानक मागणी आली आहे. धनोडा हे पैनगंगेच्या किनाऱ्यावरील गाव आहे. हे गाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर आहे. गेल्या काही दिवसांपासून या गावात अचानक गाढवे दिसायला लागली होती. या गाढवांची संख्या ही वाढत गेलेली पाहायला मिळाली. बारकाईन पाहणी केली असता ही गाढवे वाळू वाहून नेत असल्याचे दिसून आले.

ग्रामीण भागातून गाढवे ही जवळपास गायब झाली आहेत. पूर्वी गावांमध्ये गाढवे उनवाडपणे फिरताना दिसायची, मात्र आता गाढवे दिसतच नाहीत. गाढवांमधून उत्पन्न मिळेनासे झाल्याने ती पाळणाऱ्यांनीही इतर उद्योगधंद्यांकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र तस्करांमुळे गाढवांना असलेली मागणी अचानक वाढली आहे. गाढवांमुळे त्याच्या मालकांना दिवसाला 5 ते 7 हजार रुपये मिळायला लागले आहेत. यामुळे काहींनी प्रत्येकी 5-6 गाढवे विकत घेऊन ती वाळू तस्करीच्या कामाला लावली आहेत.

संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने रेती तस्करी सुरू आहे. धनोडा , माहूर , महागाव परिसरात गाढवांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. गाढवांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू माफियांची टोळी ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.