दहशतवाद्याच्या हत्येवरून कॅनडा,हिंदुस्थान संघर्ष

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्ये प्रकरणी मंगळवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टडो यांनी हिंदुस्थानकडे बोट दाखवल्यावर दोन्ही देशांनी परस्परांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. उभय देशांमधील तणाव वाढत असतानाच कॅनडातील द्वेषपूर्ण गुन्हे वाढले असून हिंदुस्थानी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टडो यांनी ओटावा येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केलेल्या विशेष निवेदनात 18 जून 2023 रोजी ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथे हिंदुस्थान सरकारच्या एजंटांनी शीख समुदायाचे नेते हरदीपसिंग निज्जर यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून एका हिंदुस्थानी अधिकाऱ्याला देश सोडून जाण्यास सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-20 परिषदेच्या वेळी दिल्लीत आपण हे प्रकरण उपस्थित केले होते, असे सांगणाऱ्या टडो यांच्या या निवेदनामुळे खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानने तत्काळ हे आरोप फेटाळत कॅनडाला सुनावल्यावर नमते घेत टडो यांनी आम्हाला भारताला चिथावायचे नाही आणि तणाव वाढवायचा नाही. आम्ही काही तथ्ये समोर ठेवली आहेत. आम्हाला या मुद्दय़ावर भारत सरकारसोबत काम करायचे आहे जेणेकरून सर्वकाही स्पष्ट होईल, असे म्हटले आहे.

कॅनडाचे आरोप हिंदुस्थानने फेटाळले

टडो यांनी केलेले आरोप फेटाळून लावत हिंदुस्थानने कॅनडाला मंगळवारीच फटकारले. कॅनडात होणाऱ्या कोणत्याही हिंसाचारात हिंदुस्थानी सरकार सहभागी असल्याचा आरोप करणे अत्यंत मूर्खपणाचे आणि राजकीयदृष्टय़ा प्रेरित आहे. हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका पोहोचवणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय मिळत असतो या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये यासाठी असे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणावर कॅनडाच्या सरकारची निक्रियता ही दीर्घकाळापासून आणि सतत चिंतेची बाब आहे. कॅनडाच्या राजकीय व्यक्तींनी उघडपणे अशा घटकांबद्दल सहानुभूती व्यक्त करणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. अशा घडामोडींशी भारत सरकारचा संबंध जोडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही नाकारतो. आम्ही कॅनडा सरकारला विनंती करतो की, आपल्या भूमीतून कार्यरत असलेल्या सर्व हिंदुस्थानविरोधी घटकांवर त्वरित आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करावी, असे परराष्ट्र खात्याने तत्काळ प्रसृत केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. शिख्स फॉर जस्टीस या खलिस्तानवादी संघटनेचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने, कॅनडातील हिंदूंनी हिंदुस्थानात परत जावे, असे धमकावले आहे.

कॅनडातील हिंदुस्थानी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला

कॅनडात सुरू असलेल्या हिंदुस्थानविरोधी कारवाया पाहता तेथे राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. अलीकडच्या काळात हिंदुस्थानी मुत्सद्दी आणि कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या हिंदुस्थानी समुदायाच्या विशिष्ट वर्गाला धमकावण्याच्या घटना वाढल्या आहेत. काहीही अडचण वा तक्रार असल्यास हिंदुस्थानी नागरिक आणि विद्यार्थी उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वेबसाईटवर तक्रारी नोंदवू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.

कॅनडातील रॉचे अधिकारी हिंदुस्थानात परतले 

दहशतवादी निज्जरच्या हत्ये प्रकरणी कॅनडामधील रॉचे अधिकारी पवन कुमार राय यांच्यावर टडो यांनी आरोप केला होता. त्यांचे नाव उघड झाल्यामुळे ते हिंदुस्थानात परतले आहेत. पवन कुमार राय हे 1997च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील पंजाब केडरचे अधिकारी आहेत. आता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

11 दहशतवाद्यांचा कॅनडात आश्रय

हिंदुस्थानात गुन्हे करून कॅनडात आश्रय घेतलेल्या काही गुंड आणि दहशतवाद्यांची यादी एनआयएने फोटोंसह जारी केली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार, अटकेतील गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई, निज्जरचा साथीदार अर्शदीप सिंग गिल ऊर्फ अर्श डल्ला, दरमन सिंग काहलॉन, लखबीर सिंग, दिनेश शर्मा ऊर्फ गांधी, नीरज ऊर्फ पंडित, गुरपिंदर, सुखदूल, गौरव पटियाल ऊर्फ सौरभ गँगस्टर दलेर सिंग यांचा या यादीत समावेश आहे. कॅनडातून 9 शीख दहशतवादी संघटना सध्या सक्रीय आहेत.