कसोटी ड्रॉ सुटल्याचा हिंदुस्थानला फटका

हिंदुस्थानची कसोटी विजयाची संधी पावसाने हिरावून नेल्यामुळे दुसरी कसोटी अनिर्णितावस्थेत सुटली, पण कसोटी अनिर्णित सुटल्याचा फटका हिंदुस्थानला बसला असून कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत पाकिस्तानने हिंदुस्थानचे अव्वल स्थान हिसकावले आहे. जर हा कसोटी सामना हिंदुस्थानने जिंकला असता तर क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले असते.

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाहून गेला आणि हिंदुस्थानच्या विजयाचे रूपांतर अनिर्णित सामन्यात झाले. हिंदुस्थानने विंडीजसमोर 365 धावांचे आव्हान ठेवले होते आणि प्रत्युत्तरादाखल विंडीजची 2 बाद 78 अशी अवस्था होती. शेवटच्या दिवशी विंडीजला 289 धावा करायच्या होत्या तर हिंदुस्थानला 8 विकेट मिळवायच्या होत्या, पण दिवसभरात एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यामुळे दृष्टिक्षेपात असलेला 2-0 चा मालिका विजय 1-0 असा झाला. जिंकणारी कसोटी ड्रॉ झाल्यामुळे हिंदुस्थानच्या जागतिक क्रमवारीतील गुणांना चांगलाच फटका बसला. हिंदुस्थानने पहिली कसोटी जिंकून 12 गुण मिळविले होते आणि दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने हिंदुस्थानला केवळ चारच गुण मिळाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानही सध्या लंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. त्यांनीही लंकेविरुद्ध पहिली कसोटी जिंकल्यामुळे ते थेट 100 टक्के यश मिळवित पहिल्या स्थानी पोहोचले आहेत