देशात इंडिया आघाडीचे सरकार येणारच; आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास

ईडी, सीबीआय, आयटीसह भाजप मिंधे गट, राष्ट्रवादीचा फुटीर गट सोबत घेऊन अब की बार चारसो पार ही घोषणा देत असले तरी देशात आणि राज्यात सर्वत्र परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर बसणारच, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजप चारशे पार चंद्रावर, गृहावर पिंवा चीनमध्ये करू शकतात;. मात्र देशात 400 पार करू शकणार नाही. ते दोनशेचा आकडा पार करणार नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

आतंकवाद संपला तर हल्ला झालाच कसा?

पुढे बोलताना ते म्हणाले की, जम्मूकश्मीरमधील 370 कलम हटवले. कश्मीरमधून 370 कलम काढले असले तरी त्या ठिकाणी भाजप निवडणूक घेऊ शकले नाही. आतंकवाद संपला असे जाहीर करीत असलेतरी परवाच कश्मीरमध्ये वायुसेनेच्या ताफ्यावर आतंकवादी हल्ला झाला. मग हा हल्ला झालाच कसा याचे उत्तर भाजपने द्यावे. आतंकवाद संपलेला नाही. कश्मिरी पंडित घरी जाऊ शकत नाहीत. कश्मीरमध्ये वेगळे राज्य स्थापन करणार असे सांगत असले तरी ते भाजप परत तेथे गेले नाही. लडाखच्या खासदाराने निवडणूक लढविणार नाही, एकही भूल कमल का फूल असे म्हणत खासदाराने निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची रत्नपूर तालुक्यातील गल्लेबोरगाव आणि गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपूंजी येथे जाहीर सभा झाली. या सभेला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशात आणि राज्यात सर्वत्र परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप त्यांच्या ईडी, सीबीआय, आयटीसह मिंधे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट घेऊन निवडणूक लढवत आहे. अब की बार चारशे पारचा नारा देत आहे. भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन भाजप पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे सांगत असले तरी दक्षिणेतील केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांत भाजपला खासदार मिळणार तरी किती? मध्य भारत, उत्तर भारत, ईशान्य, बिहारमध्येदेखील भाजपचे खासदार येणार नाहीत. साऊथ  साफ, नार्थ हाफ अशी अवस्था भाजपची होणार असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. या सभेला शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उमेदवार चंद्रकांत खैरे, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, आमदार उदयसिंग राजपूत, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, लोकसभा समन्वयक प्रदीप खोपर्डे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्यासह पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.

भाजपकडून आता वाद उकरून काढण्याचा प्रयत्न

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हेमत सोरेन यांना जेलमध्ये टाकले. आता दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडीच्या आप पक्षाला मिळणार आहेत. पंजाबमधील एकही जागा भाजपला मिळणार नाही. मग महाराष्ट्र तरी कसा मागे राहील. महाराष्ट्रातही 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यामुळे भाजपसह त्यांच्या मित्रपक्षाची पायाखालची वाळू सरकू लागली आहे. देशात भाजप हारण्याची स्थिती निर्माण होते त्यावेळी ते हिंदू-मुस्लीम, हिंदू-हिंदू असा वाद उकरून काढत भांडणे लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतो, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा या राक्षसाने तीन हजार महिलांवर अत्याचार केले. त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. बलात्कारी रेवण्णाला संरक्षण देण्याचे काम भाजपने केले. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार का? महिलाचे संरक्षण व सुरक्षा न करणाऱया भाजपला तुम्ही मतदान करणार का, असा जाहीर सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारताच जनसमुदायातून नाही, नाही, आम्ही भाजपला मतदान करणार नाही, असा एकच आवाज घुमला.

खरीपाच्या तोंडावर खते महागली दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ऐन खरीपाच्या तोंडावरच खतांचे भाव प्रचंड वाढविण्यात आले आहे. शेतकऱयांच्या हिताचे हेच का संरक्षण, असा सवाल करीत दानवे म्हणाले की, पानंद रस्ते, गोठे, विहीरीचे अनुदान देण्यासाठी गद्दार पालकमंत्री टक्केवारी घेत असल्याचा आरोप  दानवे यांनी केला. या गद्दाराने पैठणचा साखर कारखाना लुटला, विहामांडवाच्या साखर कारखान्यात मनीलॉण्डरिंग झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.

भाजपकडून निधी मिळाला नाही खैरे

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून जिह्यातील नागरिकांची सेवा करीत आहे. सोलापूर-धुळे रस्ता मंजूर केला. पाणी पुरवठा योजना मंजूर केली. काँग्रेसच्या काळात कधीही विकासकामात राजकरण झाले नाही. मात्र मोदींच्या सरकारने निधी दिला नाही. दुष्काळी मराठवाडय़ाचा मोदींनी एकदाही दौरा केला नाही. आता मात्र सभा घेण्यासाठी दौरे करीत आहेत, असेही खैरे म्हणाले.