राज्यातील मार्ग बनले मृत्यूचा महामार्ग! पाच महिन्यांत रस्ते अपघातात 6,473 जणांचा बळी

रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले राज्यातील मार्ग आता मृत्यूचा महामार्ग ठरू लागले आहेत. महामार्गावर वाऱयाच्या वेगाने धावणाऱया वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच महिन्यांत राज्यात तब्बल 5 हजार 897 प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये 6 हजार 473 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघातांमध्ये बळी जाणारी संख्या चिंताजनक आहे.

समृद्धी महामार्गावर नुकत्याच खासगी लक्झरी बसला झालेल्या अपघातात 25 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे रस्ते अपघात आणि त्यामध्ये जाणाऱया बळींचा मुद्दा चव्हाटय़ावर आला आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत महामार्गावर जवळपास 6 हजार अपघात झाले असून त्यामध्ये बळी गेलेल्यांचा आकडाही मोठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 6 हजार 337 अपघातांमध्ये 6 हजार 915 जणांचा बळी गेला होता. सदरचे अपघात वाहनांच्या वाढत्या वेगामुळे घडत आहेत. दरम्यान, अपघातात बळी जाणाऱयांमध्ये 90 टक्के पुरुष असल्याने त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्टय़ा रस्त्यावर येत आहेत.

वर्ष        अपघात       बळी
2019   11,787    12,788
2020   10,773    11,569
2021   12,554    13,528
2022     1458     15,224