राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याचे खून प्रकरण; पोलिसांनी आरोपींची शहरातून काढली धिंड

राहुरीतील ऍड. आढाव दाम्पत्याचे हत्याकांड घडल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ती तीव्रता कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हत्याकांडातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी राहुरी शहरातून पायी फिरवत धिंड काढली. पोलिसांच्या या कृतीची शहरामध्ये चर्चा सुरू होती.

राहुरी येथील ऍड. राजाराम आणि त्यांच्या पत्नी ऍड. मनीषा आढाव यांचे 25 जानेवारीला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत सराईत आरोपी किरण दुशिंग (रा. उंबरे), सागर खांदे (रा. येवले आखाडा), शुभम महाडिक (रा. मानोरी), हर्षल ढोकणे (रा. उंबरे), बबन मोरे (रा. उंबरे) या पाचजणांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने पाच साथीदारांनसह कट करून आढाव दाम्पत्याचे हत्याकांड केल्याचे राहुरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. आढाव दाम्पत्याच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने सीआयडीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींकडून ऍड. मनीषा आढाव यांची पर्स मुळा नदीपुलावरून ज्या ठिकाणी फेकली, तेथून ताब्यात घेण्यात आली आहे.

पर्सचा शोध घेण्यापूर्वी पोलिसांनी राहुरी शहरातून आरोपींची पायी धिंड काढली. राहुरी पोलीस ठाण्यापासून शनि चौक-नवी पेठ नगर-मनमाड रोडने मुळा नदीपुलावर या आरोपींना पायी फिरविले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान पडोळ, धर्मराज पाटील, तसेच राहुरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी होता.

गृहमंत्री फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष

वकील आढाव दाम्पत्याचे कोर्टातून अपहरण करून हत्या झाल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातील वकिलांमध्ये उमटले आहेत. या हत्याकांडाबाबत वेगवेगळी माहिती पसरत असल्याने वकिलांबरोबर समाजमनाच्या भावनादेखील तीव्र होत आहेत. या घटनेनंतर वकिलांनी वकील संरक्षण ऍक्टची मागणी लावून धरली आहे. यासाठी कोर्टाच्या कामकाजापासून 3 फेब्रुवारीपर्यंत अलिप्त राहून धरणे आंदोलन सुरू केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्या (2 रोजी) वकिलांचे शिष्टमंडळ वकील संरक्षण ऍक्टच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर वकील संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत.

वकील उद्या आझाद मैदानावर

राहुरी येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ उद्या (2 रोजी) आझाद मैदान मुंबई येथे वकील संघटना आंदोलन करणार आहे. राज्य शासनाने वकील संरक्षण कायद्याबाबत ठोस आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेतले जाणार आहे. वकील संरक्षण कायद्याबाबत शासनाने चालढकल केल्यास आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राहुरी येथील वकील विशाल होले यांनी दिला आहे.