बहिणीच्या प्रियकराची हत्या; भावाला अटक, श्रीरामपूर तालुका पोलिसांची कारवाई

तालुक्यातील भोकर येथून प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीच्या प्रियकराची भावाने हत्या केल्याची घटना घडली. संभाजीनगर जिह्यातील इसारवाडी फाटा परिसरात बहिणीच्या प्रियकराचा खून करून पळून जात असलेल्या आरोपीला अवघ्या चार तासांत भोकर ते खोकर फाटादरम्यान तालुका पोलिसांनी अटक करून वाळूंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बाबासाहेब छबुराव खिलारी असे खून झालेल्याचे नाव आहे.

भोकर येथून काही वर्षांपूर्वी गावातच राहणारा बाबासाहेब छबुराव खिलारी याने गावातीलच एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याची चर्चा काही दिवस चालली. परंतु गुरुवारी (दि. 29) दुपारी गावातील तरुणीला पळवून नेणाऱया बाबासाहेब खिलारी यांची संभाजीनगर जिह्यातील विसारवाडी फाटा परिसरात हत्या झाल्याची वार्ता गावात पोहचली. ही हत्या त्याने पळवून नेलेल्या तरुणीच्या भावाने केली असून, तो श्रीरामपूरकडे आला व तालुका पोलिसांत हजर झाल्याची चर्चा गावात सुरू होती. अखेर रात्री उशिराने तालुका पोलिसांनी संभाजीनगर येथील खुनाच्या गुह्यातील आरोपीस अवघ्या चार तासांत अटक केल्याची माहिती दिली.

वाळुज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुह्यातील आरोपी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळाल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांकडून श्रीरामपूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना देण्यात आली होती. त्यानुसार थोरात यांनी पोलीस पथक खोकरकडे रवाना केले. या पथकाने भोकर शिवारातील खोकर फाटा परिसरात दुचाकीवरून आलेल्या आरोपीला पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याला वाळुज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक संजय निकम, अतुल बोरसे, सहायक फौजदार हबीब अली, पोलीस नाईक अनिल शेगाळे, प्रशांत रणनवरे, कॉन्स्टेबल संदीप पवार यांनी ही कारवाई केली.