देशभर फिरण्यासाठी मागितली सूट , देशमुख यांची न्यायालयात धाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईबाहेर संपूर्ण देशभर फिरण्यासाठी कायमस्वरूपी सूट मागत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात मंजूर झालेल्या जामिनाच्या अटी-शर्ती काही प्रमाणात शिथिल कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

देशमुख यांना उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्यांना मुंबईबाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे वेळोवेळी परवानगी घेण्यासाठी देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर देशभर फिरण्यासाठी कायमस्वरूपी सूट देण्याबाबत जामिनातील अट शिथिल करण्यात यावी, अशी विनंती करीत देशमुख यांनी अॅड. इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मतदारसंघातील जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तसेच बैठका आणि खटल्यातील तज्ञ वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी मुंबईबाहेर जावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.