जिरवाजिरवीच्या राजकारणात खासदार विखे पटाईत; नीलेश लंके यांचा हल्लाबोल

खासदार म्हणून विकासकामे करण्याऐवजी खासदार सुजय विखे हे जिरवाजिरवीच्या राजकारणात पटाईत आहेत, असा हल्लाबोल महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला.

नीलेश लंके यांच्या ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रे’स जामखेड तालुक्यातील खर्डा येथून प्रारंभ होऊन जामखेड शहरात समारोप झाला. यावेळी त्यांनी विविध गावांतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळी अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

नीलेश लंके म्हणाले, विकासकामे सोडून खासदार विखे हे डाळ, साखर वाटत होते. खासदारकीच्या पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडून विकासाच्या मुद्दय़ावर त्यांनी निवडणुकीला सामोरे जाणे अपेक्षित आहे. मात्र, जिरवाजिरवीच्या राजकारणात ते पटाईत असून, त्यांनी जिह्यात किती उद्योग आणले? किती तरुणांच्या हाताला काम दिले? हे सांगून मते मागावीत. इंग्लिश भाषा येते का म्हणून हिणवण्यात काय हाशील आहे, असा सवाल लंके यांनी केला. दरम्यान, मी खासदार होणारच आहे. खासदार झाल्यानंतर विजयाची पहिली सभा जामखेड येथे घेणार असल्याचे सांगत जामखेडला रेल्वे आणू, अशी ग्वाही लंके यांनी दिली.

यावेळी दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, शहाजीराजे भोसले, राहुल उगले, सूर्यकांत मोरे, संजय वराट, राजेंद्र पवार, राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, वसीम सय्यद, राहुल बेदमुथा, सुरेश पवार, संदीप गायकवाड, हनुमंत पाटील, सुरेश भोसले, वैजनाथ पोले, कुंडल राळेभात, प्रशांत राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, प्रा. विकी घायतडक, अभय शिंगवी, प्रकाश सदाफुले, रमेश आजबे, सचिन शिंदे, प्रवीण उगले, बाबासाहेब उगले, युवराज उगले, बाबासाहेब मगर, भानुदास बोराटे, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, भीमराव लेंडे पाटील, बप्पा बाळे, हरिभाऊ बेलकर,नय्यूम शेख उपस्थित होते.