पत्रकारितेवर कोणाचाही दबाव असता कामा नये;पवारांकडून एका ओळीत अभिनंदन आणि टोलाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या देशासाठीच्या योगदानाचा उल्लेख केला. भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी केवळ एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले. मात्र त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सामान्य माणसांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रकारितेचा जबरदस्त शस्त्र म्हणून वापर केला. त्यांनी केसरी वर्तमानपत्र आणि मराठा साप्ताहिक सुरू केले असे सांगतानाच पत्रकारितेवर कोणाचाही दबाव असता कामा नये, असा टोलादेखील लगावला.

लोकमान्य टिळक पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. यापूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला, याचा आनंद आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो, असे शरद पवार म्हणाले.

देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांनी केला

या देशात अनेक राजे होऊन गेले पण त्यांचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचे. पण छत्रपती शिवाजीमहाराजांनी उभारलेलं राज्य भोसल्यांचे राज्य नव्हे तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजीमहाराज यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्य होते. अलीकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्याची मोठी चर्चा झाली. पण पुण्यात हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाची बोटे छाटून लाल महालात पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजीमहाराज यांनी केला होता. ही गोष्ट विसरता येणार नाही शरद पवारांनी सांगितले.

शरद पवार 10 मिनिटे आधी व्यासपीठावर

शरद पवार हे कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर दहा मिनिटे व्यासपीठावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होताच त्यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळ जाऊन हात जोडून नमस्कार केला. पवार यांच्या हातात हात देत स्मितहास्य केले. तेव्हा पवार यांनी देखील मोदींची पाठ थोपटली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला तेव्हा पवार हे देखील त्यांना हसून दाद देत होते. दरम्यान, कार्यक्रम संपल्यावर अजितदादा हे शरद पवार यांच्या समोरून न जाता त्यांच्या खुर्चीच्या मागून निघून गेले.