किमान वैज्ञानिकांचे तरी श्रेय लाटू नका, संजय राऊत यांचा राज्यसभेत सरकारवर हल्लाबोल

टाळ्या वाजवणे, पापड खा रोग पळून जातील असे सुचविणे, थाळ्या बडवणे हे विज्ञान नाही. मात्र विज्ञानाच्या विपरीत गोष्टी करणारे सरकारच वैज्ञानिकांचेही श्रेय घेऊ पाहत आहे. किमान वैज्ञानिकांचे श्रेय तरी लाटू नका, अशा शब्दांत आज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरकारवर हल्लाबोल केला.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेच्या नवीन सभागृहातील पहिलेच भाषण दणक्यात करत सरकारची पिसे काढली. राज्यसभेत चांद्रयान मोहिमेवर आज चर्चा झाली. या मोहिमेचे श्रेय घेण्याचा सरकारचा आटापिटा असतानाच सरकारच्या या धोरणाची राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाभाडे काढले.

कोरोना काळात देशातील वैज्ञानिकांनी केलेले काम अजोड होते, मात्र ज्यांनी अथक प्रयत्नांनी कोरोना लस बनवली त्यावर पंतप्रधानांनी आपला फोटो चिटकवला, असा टोलाही त्यांनी लगावला. कोरोना लस येण्याअगोदर हीच मंडळी टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, अमूक तमूक पापड खा कोरोना पळून जाईल, अशा भाकडकथा सांगायची. या गोष्टी म्हणजे विज्ञान नाही, असेही खासदार राऊत यांनी ठणकावून सांगितले.

नालीवरच्या गॅसपासून स्वंयपाकासाठी गॅस वापरता येतो, असा अफलातून शोध सध्याच्या पंतप्रधानांनी लावला आहे. पंडित नेहरूंच्या काळातही नाले होते, मात्र त्यांनी कधी असा जावईशोध लावला नाही, असा खरमरीत टोलाही खासदार राऊत यांनी लगावला. संजय राऊत यांच्या भाषणातील टीका झोंबणारी असल्याने सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी आरडाओरड करत त्यांच्या भाषणांत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.