बेकायदा बॅनरची निवडणूक आयोगाकडे तक्रार; दिव्यात मिंधेंच्या टोळीचा शिवसेना विभागप्रमुखावर हल्ला

बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेल्या बॅनरची तक्रार निवडणूक आयोगाला दिल्याचा राग मनात धरून मिंधेंच्या टोळीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागप्रमुखावर हल्ला करण्यात आला असल्याची घटना दिव्यात घडली आहे. या हल्ल्यात विभागप्रमुख नागेश पवार बचावले नागेश पवार असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पवार यांनी मुंब्रा पोलिसांकडे केली आहे.

दिव्यातील गणेशनगर येथे मिंधे गटाकडून बेकायदा पद्धतीने बॅनर झळकवण्यात आले होते. मुळात निवडणुकीच्या काळात असे बेकायदा बॅनर लावू नये, बॅनर लावताना परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे युवाप्रमुख नागेश पवार यांनी जिल्हा निवडणूक आयोगाकडे ऑनलाइन अॅपवर तक्रार केली. दरम्यान, याचा राग मनात ठेवून मिंधे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांचे बंधू विनोद मढवी, रुपेश मढवी, मनोज खंडागळे यांच्यासह ४० जणांच्या टोळक्याने घरात येऊन पत्नीसमोर मारहाण केल्याचा आरोप नागेश पवार यांनी केला आहे.

पोलिसांनी दखल घ्यावी

दिव्यात मिंध्यांची दादागिरी सुरू आहे. यांच्या मनमानीमुळे दिव्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शिंदे गटाच्या दहशतीला आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही. पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.

– नागेश पवार (विभागप्रमुख)