फोडा, झोडा अन् राज्य करा ही भाजपची निती; संजय राऊत यांचा हल्लाबोल

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. ही पाचही राज्य 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, मात्र या निवडणुकांसह मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुकाही जाहीर करा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच फोडा, झोडा आणि राज्य करा ही भाजपची निती असून कितीही फोडाफोड केली तरी मूळ विचार पक्षाकडेच असतो, असेही राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, पाचही राज्य 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आम्हाला खात्री आहे या पाचही राज्यात ‘इंडिया’ आघाडी एकत्र लढेल आणि विजयी होईल. छत्तीसगडसह इतर दोन राज्य आमच्या ताब्यात असून मध्य प्रदेश गेल्यावेळी जिंकलो होतो. यावेळी पुन्हा जिंकू. तेलंगणाही जिंकण्याची 100 टक्के खात्री आहे. पाचही राज्यात वेळेत निवडणुका व्हायला हव्यात आणि त्या होतील. पण मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 14 महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर करताय? मुंबईसह 14 महापालिकांवर जे प्रशासक नेमलेले आहेत, त्यांच्या माध्यमांतून हे सरकार कारभार करतंय, भ्रष्टाचार बोकाळलाय, अनागोंदी माजलीय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह 14 महापालिकांचे सुद्धा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.

‘बाळासाहेबांना विठ्ठल… विठ्ठल… म्हणत पक्ष फोडला. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते, आमची शिवसेना खरी सांगत पक्ष फोडला. भाजपने ही नवीन फोडा, झोडा व राज्य करा ही निती देशाच्या राजकारणात आणलेली आहे. घरं फोडायचे.. पक्ष फोडायचे… शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, समाजवादी पार्टीही फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आता शिवपाल यादव आणि अखिलेश यादव पुन्हा एकत्र आलेले आहेत. भाजपने कितीही पक्ष फोडले तरी मूळ विचार हा मूळ पक्षाकडे असतो’, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे. शिंदेची शिवसेना म्हणतात तेव्हा लोकं हसतात. अजित पवारांची राष्ट्रवादी म्हटल्यावरही लोकं हसतात, वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतेय. शरद पवार हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवार समोर बसले होते आणि प्रफुल्ल पटेल, अजित पवार आमचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा असा दावा करताहेत. मग शरद पवार काय मेणाचा पुतळा आहे का? समोर पक्षाचा संस्थापक, अध्यक्ष बसलाय, निवडणूक आयोगालाही काही वाटले पाहिजे. उद्धव ठाकरे इथे बसलेले आहेत आणि कोणीतरी पक्षावर दावा सांगतो, हे प्रकार भाजपने सुरू केलेले आहेत. ही या देशाची लोकशाही, घटना पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

शरद पवार हुकुमशहा असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ठीक आहे, आहोत आम्ही हुकुमशहा. आमचे पक्ष आहेत, कसे चालवायचे आम्हाला माहिती आहेत. ज्या हुकुमशहाने अजित पवारांना 5 वेळा उपमुख्यमंत्री केले, ज्या हुकुमशहाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यापासून केंद्रापर्यंत पदं दिली, ज्या हुकुमशहाने तुरुंगातून सुटलेल्या भुजबळांना मंत्रिपद दिलं. तुम्ही कुणाला हुकमशहा म्हणता? लाज वाटली पाहिजे असे शब्द वापरताना. तुम्ही आमच्यावरही तेच आरोप करताय ना. हे आरोप तुम्ही करत नसून दिल्लीतून काळ्या टोपी वाल्यांचे स्क्रिप्ट येतं आणि ते तुम्ही वाचून दाखवता.