रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांची संख्या वाढवा!

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात माफक दरात रुग्णसेवा मिळत असल्यामुळे मुंबईसह देशभरातून रुग्ण येत असतात. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे सिटीस्पॅन, एमआरआय आणि सोनोग्राफीसाठी रुग्णांना दोन दोन महिन्यांच्या तारखा दिल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी रुग्णालयातील एमआरआय, सिटीस्पॅन आणि सोनोग्राफी मशीन्समध्ये वाढ करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केईएम प्रशासनाकडे केली.

परळ येथील केईएममध्ये येणाऱया रुग्णांची संख्या पाहून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, योग्य वेळी शस्त्रक्रिया व्हावी, उपचारांदरम्यान मोफत औषधे उपलब्ध व्हावीत, डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, कर्मचारी, तंत्रज्ञ अशा रिक्त जागांची तातडीने भरती करावी यासाठी शिवसेना गटनेते अजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ, डॉ. हरीश पाठक, रुग्णालय अधीक्षक डॉ. मोहन देसाई, प्रशासकीय अधिकारी, रेडिओलॉजी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रलंबित खरेदीचा मुद्दा अधिवेशनात उचलणार
केईएम रुग्णालय प्रशासनाने एमआरआय, सिटीस्पॅन, सोनोग्राफी मशीन्स खरेदीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील मध्यवर्ती खरेदी खात्याकडे (सीपीडी) पाठवण्यात आला आहे, मात्र हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मार्गी लागावा आणि रुग्णांची गैरसोय दूर व्हावी यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी दिली.