शेअर बाजारात ‘तुफान आलया’

शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तुफान पाहायला मिळाले. शेअर बाजाराची सुरुवात आजही रेकॉर्डब्रेक ठरली. शेअर बाजारासाठी डिसेंबर महिना आतापर्यंत जबरदस्त ठरला आहे. गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत 22 लाख कोटी रुपयांहून जास्त कमाई केली आहे. अवघ्या 11 दिवसांत अनेकांची चांदी झाली आहे. केवळ आजच्या दिवसात गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटी रुपये नफा कमावला आहे. आज सकाळपासूनच सेन्सेक्सने एक नवा रेकॉर्ड रचला असून पहिल्यांदा 71 हजार अंकाचा आकडा पार केला आहे. बीएसई सेन्सेक्स 969.55 अंकांच्या उसळीनंतर 71,483.75 अंकांच्या रेकॉर्डवर स्थिरावले. निफ्टीने 104 अंकाच्या वाढीसोबत 21 हजार 287 अंकावर सुरुवात केली. सेन्सेक्स पहिल्यांदा 70800 वर उघडला.

आझाद कंपनीचा आयपीओ येतोय
आझाद इंजिनीअरिंग कंपनीने आपला 740 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी मूल्य निर्धारित केले आहे. 499 ते 524 रुपये प्रति इक्विटी शेअर असेल. हा आयपीओ 20 डिसेंबरला ओपन होऊन 22 डिसेंबरला बंद होईल, तर एंकर गुंतवणूकदारांसाठी 19 डिसेंबर एक दिवस आधी आयपीओची बोली लावतील. पंपनी 240 कोटी रुपयांचे नवीन शेअर आणि सध्याच्या शेअरधारकांद्वारे 500 कोटी रुपयांचे इक्वीटी शेअर्सची ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ही पंपनी इंजिनीअरिंग ऊर्जा, एअरोस्पेस आणि संरक्षण, तेल आणि गॅस इंडस्ट्रीसाठी ओरिजनल इक्विपमेंट बनवण्याचे काम करते.

किआ सोनेट फेसलिफ्ट लाँच
किआने अखेर आपल्या सोनेट 2024 च्या फेसलिफ्ट व्हर्जनवरून पडदा हटवला आहे. किआ सोनेटच्या या नव्या व्हर्जनची बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने या कारला अॅडव्हान्स फीचर्ससोबत लाँच केले आहे, परंतु कंपनीने या कारच्या किमतीचा खुलासा केला नाही. या कारमध्ये नवीन हेडलाइट्स आणि डीआरएल सेटअप, फ्रंट ग्रिलला अपडेट दिले आहे. टेललॅम्पला रीडिझाइन केले आहे. यात 10.25 इंच स्क्रीन, 360 डिग्री पॅमेरा, 6 एअरबॅग्स, 10 ऑटोनोमस फंक्शन, 70 हून जास्त कनेक्टेड फीचर्स तसेच तीन इंजिन ऑप्शन दिले आहेत.