नेव्ही नगर परिसरात संशयित बोटीचा वावर  

नववर्षाच्या पूर्वसंध्येला नेव्ही नगर परिसरात संशयित बोट फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस व नौदलासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. गस्तीनौकांनी तत्काळ समुद्रात गस्त घातली, पण कोणतेही संशयित बोट सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नौदलाच्या डेप्युटी लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱयाकडून याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून सूचित करण्यात आले. यलोगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटणकर व त्यांच्या पथकाने गस्तीनौकेतून लाईट हाऊस परिसरात शोधमोहीम राबवली. त्याशिवाय मुंबई सागरी पोलिसांच्या ‘कोयना’ नौकेनेही टीआयएफआर परिसरात शोधमोहीम राबविली. परंतु धुक्यामुळे ही बोट कोणत्या दिशेने गेली हे समजू शकले नाही. त्यानंतर यलोगेट, सागरी 1, सागरी 2, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मीरा-भाईंदर, रायगड, सागरी सुरक्षा यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाच्या मेस व शिव मंदिर परिसरात ‘कोयना’ नौका तैनात करण्यात आली आहे.