दुचाकीस्वार चोरटे सुसाट, भरदिवसा 6 महिलांचे दागिने लंपास

पुणे शहरातील महिला सुरक्षिततेचा जप करणार्‍या पुणे पोलिस आयुक्तांच्या नाकावर टिच्चून दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला आहे. भरदिवसा जेष्ठ महिलांसह पादचारी अन कामावरून सुटलेल्या भगिनींना लक्ष्य करीत चोरट्यांकडून दागिने हिसकावून नेले जात आहे. अवघ्या दोन आठवड्यात सिंहगड, अलंकार, चतुःशृंगी, भारती विद्यापीठ परिसरातून ६ महिलांचे लाखो रूपयांचे दागदागिने चोरट्यांनी झटक्यात चोरून नेले आहे. याप्रकरणी अद्यापही स्थानिक पोलिसांना चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

पुणे पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर अमितेश कुमार यांनी सराईतांची परेड घेउन तंबी दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच रायझिंग गँगसह इतरांनी वाहन तोडफोड करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. विशेषतः चंदननगर परिसरातील महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नाची घटना ताजी असताना, आता पादचारी जेष्ठ महिलांसह मुली आणि कामगार महिलांची सुरक्षितता वार्‍यावर असल्याचे दिसून आले आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी चाललेली जेष्ठ महिला, ध्यानधारणेसाठी निघालेली महिला, हॉटेलमध्ये चहा पिउन कामावर जाणार्‍या महिलेसह तरूणींना दुचाकीस्वार चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. त्यांच्या गळ्यातील तब्बल ५ ते ६ लाखांवर किमतीचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटनांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 बेसिक पोलिसिंगकडे लक्ष्य देण्याची आवश्यकता

महिलांच्या सुरक्षितेत आम्ही कुठलीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली होती. मात्र, दिवसाढवळ्या महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या वाढलेल्या घटना, स्थानिक पोलिसांचे रेंगाळेले बीट मार्शलिंग, पेट्रोलिंगचा दिखावा, महिलांसह तक्रारदारांसोबत असभ्य वर्तणूकीमुळे साहेब, हीच का महिला सुरक्षितता असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यासोबतच घरफोड्या, पीएमपीएल बसप्रवासात दागिन्यांसह ऐवज हिसकाविणार्‍या कायर्रत झालेल्या टोळ्या, वाहन तोडफोडीमुळे पुणेकरांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत बेसिक पोलिसिंगवर लक्ष देण्याची आवश्यकता असतानाही, मात्र साहेबांच्या धास्तीने स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांनी कामावरचे लक्ष्य कमी केले आहे का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

भरदिवसा सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना

4 फेब्रुवारी (सिंहगड पोलीस ठाणे)- आनंदननगर परिसरात मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या क्षमा शेणीतकर यांचे 45 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले.

6 फेब्रुवारी (अलंकार पोलीस ठाणे)-रस्त्याने चाललेल्या ताराबाई मते यांचे 50 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

6 फेब्रुवारी (चतुःशृंगी पोलीस ठाणे)- चहा पिल्यानंतर मैत्रिणीसोबत चाललेल्या स्मिता देशपांडे यांचे 80 हजारांचे मंगळसूत्र हिसकाविले.

11 फेब्रुवारी ( भारती विद्यापीठ)-ध्यानधारणेसाठी चाललेल्या भारती उडताले यांच्या गळ्यातील 1 लाख 25 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले.

15 फेब्रुवारी (सिंहगड पोलीस ठाणे) मैत्रिणीसोबत चाललेल्या संगीता शेंडकर यांचे 4 वाजून 40 मिनीटांनी चोरट्यांनी 50 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले.

15 फेब्रुवारी (सिंहगड पोलीस ठाणे)- पहिल्या घटनेनंतर अवघ्या पाच मिनीटांनी चोरट्यांनी 4 वाजून 45 मिनीटांनी अर्चना सुर्यवंशी यांचे 35 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.