कांदा कापूस द्राक्ष बागांवर अवकाळीचा पावसाचा घाला; श्रीगोंदा तालुक्यात मोठे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

श्रीगोंदा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिकठिकाणी व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने कांदा, कापूस, लिंबू, डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पारगाव घारगाव बेलवंडी लोणी व्यंकनाथ, घोटवी, वडाळी, पिंप्री कोलंदर, उक्कडगाव, येळपणे, चिंभळे, आदी परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात कापूस पाच ते सहा हजार हेक्टर तर गुलाबी कांदा सुमारे शंभर हेक्टर तर डाळिंब तीन हजार हेक्टर तर लिमुनी पाच हजार हेक्टर असून द्राक्ष बागा सुमारे बाराशे हेक्टर आहेत.

शेतकऱ्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून मुलाबाळाप्रमाणे काळ्या आईत जिवापाड प्रेम करून शेती फुलवली होती. परंतु सुमारे तीन दिवसापासून अचानक आलेल्या सोसाट्याचा वारा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा कापूस या पिकांसह द्राक्ष बागा फुलोऱ्यात आणि पोंगा अवस्थेत असल्याने द्राक्षमण्यांची मोठ्या प्रमाणात गळ होऊन त्यावर बुरशीजन्य रोग घड कुज रोग, डावणी रोग यावर महागडे झाले औषधे फवारुनही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने, मका, कडवळ, कोलमडली आहेत ऊस वाहतुक तोडणी व वाहतूकीसह साखर कारखान्यावर अनिष्ट परिणाम झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

तालुक्यात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस, यामुळे कांदा कापूस यांसह ,लिंबू डाळिंब द्राक्ष या फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे यात सर्वात जास्त नुकसान द्राक्ष बागेंचे झाले आहे. या बाबतचे मंडल कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष पाहणी पंचनामे आदेश दिले आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांनी दिली.

श्रीगोंदा तालुक्यात आठ मांडलांपैकी सरासरी 106 टक्के पाऊस झाला असून यात काष्टी आणि मांडवगण मंडळात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यात जास्त नुकसान द्राक्ष बागेंचे झाले. शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकांचे नुकसानिचे पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व कामगार तलाठी यांना दिले आहेत. असे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी सांगितले.