‘कणेकरी’ लेखणी शांत झाली; चतुरस्र लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पाष्टकांची मैफल रंगवणारे बहारदार वत्ते शिरीष कणेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. खुमासदार अन् खुसखुशीत  ‘कणेकरी’ शैली शांत झाली! मागील पाच दशके कधी ‘फिल्लमबाजी’ करत तर कधी ‘फटकेबाजी’ करत क्रिकेट आणि सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवले होते. कणेकर यांच्या जाण्याने नर्मविनोदी आणि कलासक्त व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना व्यक्त होत आहे.

शिरीष कणेकर यांनी 6 जून रोजी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली होती. या वयातही त्यांचे लिखाण जोरात सुरू होते. आज सकाळी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा डॉ. अमर कणेकर अमेरिकेतून आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

लतादीदी म्हणजे दैवत

व्यक्तिचित्रण ही कणेकरांची आवडती पिच. तिथं त्यांची लेखणी जास्त रमली. अचूक निरीक्षण, मार्मिक विश्लेषणाला ओघवत्या शैलीची जोड देत ते व्यक्तीचे अंतरंग उलगडत.  त्यांच्या लेखणीतून कित्येक सरस आणि सकस व्यक्तिचित्रं उतरली आहेत. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजे त्यांची मर्मबंधातील ठेव. दीदींच्या आठवणींचा खजिनाच त्यांच्याजवळ होता. तो वेळोवेळी त्यांनी आपल्या लेखणीतून वाचकांपर्यंत पोहचवला. दिलीपकुमार, देव आनंद अशा अनेक सेलिब्रेटींवर त्यांनी विपुल लेखन केले. ‘व्यक्तिचित्र रंगवण्यात एक वेगळेच आव्हान आहे, एक वेगळीच किक आहे. ही किक मी मनापासून एन्जॉय करतो,’ असे कणेकर सांगायचे.

स्टँडअप कॉमेडी गाजली

 मराठी रंगमंचाला स्टँडअप कॉमेडीचा नजराणा कणेकरांनी दिला. त्यांच्या ‘माझी फिल्लमबाजी’ या एकपात्री प्रयोगाचे देशविदेशात अनेक प्रयोग झाले. त्यांनी ‘कणेकरी’ आणि क्रिकेटवरील  ‘फटकेबाजी’ असे दोन एकपात्री प्रयोगही रंगमंचावर आणले. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‘या कातरवेळी’ या कार्यक्रमाचे लेखन आणि सादरीकरण केले होते.

‘सामना’साठी प्रदीर्घ लेखन

6 जून 1943 रोजी जन्मलेल्या शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी करिअरची सुरुवात इंग्रजी पत्रकारितेतून केली. पुढे सर्व मराठी वर्तमानपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन सुरू केले. वयाच्या 25 व्या वर्षापासून त्यांनी लिहायला सुरुवात केली… ते अखेरपर्यंत लिहीतच होते. दैनिक ‘सामना’साठी त्यांनी प्रदीर्घ लेखन केले. सामनाच्या उत्सव पुरवणीत ‘टिवल्याबावल्या’, ‘शिरीषायन’ हे स्तंभ लोकप्रिय होते. या स्तंभलेखनातून अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी रंगवली. या स्तंभातील त्यांचे उपहासात्मक अन् हलकेफुलके लेखन वाचकप्रिय होते.

ललितपासून व्यक्तिचित्रणापर्यंत, विनोदापासून टीकात्मक, गुदगुल्या करण्यापासून खसाखसा हसवण्यापर्यंत तर कधी अंतर्मुख करण्यापासून विचारप्रवृत्त करणारे लेखन त्यांनी केले. त्यांचा एक खास चाहतावर्ग होता. चाहत्यांनीच त्यांच्या लेखणीला ‘कणेकरी’ शैली म्हणून घोषित केले. कणेकरांनी विषयाच्या बंधनात स्वतःला अडकून न घेता लेखनात मुक्त संचार केला. चित्रपट आणि संगीतात त्यांचा जीव गुंतला. तीच गोष्ट क्रिकेटची. त्यांनी जो लेखनाचा बाज निवडला, त्याला वाचकांनी उदंड प्रेम दिले. वयाच्या ऐsंशीतही ते जोमाने लिहित होते. त्यांचे वय त्यांचा उत्साह आणि त्यांचा ‘फॉर्म’ झाकोळू शकला नाही.

साहित्य संपदा

 कणेकरांची डॉलरच्या देशा (प्रवास वर्णन), यादोंकी बारात (कलाकारांची ओळख), मी माझं मला (आत्मचरित्र), यार दोस्त (व्यक्तिचित्र), रहस्यवल्ली (रहस्यकथा), लगाव बत्ती (स्तंभलेखन) आदी अनेक पुस्तके गाजली आहेत. इरसालकी, खटलं आणि खटला, गाये चला जा, गोतावळा, चापलूसकी, चापटपोळी, फटकेबाजी, सूरपारंब्या, चहाटळकी, मखलाशी, मनमुराद, एकला बोलो रे, माझी फिल्लमबाजी, गोली मार भेजे मे, क्रिकेट वेध, ते साठ दिवस, आंबटचिंबट, वेचक शिरीष कणेकर, कट्टा, नट बोलट बोलपट, शिणेमा डॉट कॉम, चंची, चर्पटपंजरी, चहाटळकी, चापलूसकी अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.