हे सरकार टिकलं तर मंत्रालयही गुजरातला नेतील! आदित्य ठाकरे यांची घणाघाती टीका

वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क असे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले असंख्य प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले. ‘महानंदा’ सारखे आणकी काही प्रकल्प गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावरून शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हे सरकार जर टिकलं तर उद्या हे मंत्रालयही सुरत, अहमदाबादला नेतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज ते कोल्हापूरला पोहोचले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात पूर्ण झालेले अनेक प्रकल्प हे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल बिल्डींग बांधून तयार आहे. मात्र त्याच्या उद्घाटनासाठी वेळ नाही. एमटीएचएलच्या उद्घाटनासाठी वेळ नाही. दिघा रेल्वे स्टेशन बांधून 8 महिने तयार आहे, मात्र त्याचेही उद्घाटन झालेले नाही. महाराष्ट्रावर होणार हा अन्याय आपण का सहन करतोय, असा सवाल आदित्य यांनी विचारला आहे. बुलेट ट्रेनला बीकेसीतील जागा निःशुल्क देण्यात आली. पारबंदर प्रकल्पावर मात्र टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागरिक असाल तर तुम्ही पैसे भरा मात्र आम्हाला सगळं फुकट पाहिजे, असा हा प्रकार असल्याचे आदित्य यांनी म्हटले.

आमदार अपात्रता प्रकरणी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी म्हटले की, “उशिराने मिळालेला न्याय हा न्याय नाकारल्याप्रमाणे आहे. संविधानानुसार गेल्यास 40 गद्दार बाद झाले पाहिजेत. मात्र तसे न झाल्यास आम्ही बाद होऊ. हिंदुस्थानात लोकशाही, संविधान टिकणार की नाही याकडे जगाचे लक्ष महाराष्ट्रावर आहे. यामुळे विधानसभा अध्यक्ष आपले नाव खराब करून घेणार नाहीत, अशी माझी अपेक्षा आहे. मात्र काल त्यांनी ते केलं आहे, प्रत्येक पाऊल स्वत:ची, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे ते काम करत आहेत. “