बनावट क्रेडिट कार्ड तयार करणारी टोळी गजाआड, राहुरी पोलिसांची कारवाई

आधार कार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून बनावट क्रेडिट कार्ड तयार करून 83 हजार रुपयांची फसवणूक करणाऱया तिघांच्या टोळीला गजाआड करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे.

नवाब ऊर्फ सोनू हबीब सय्यद (वय 30, रा. महादेववाडी, ता. राहुरी), अस्लम ऊर्फ भैया चाँद पठाण (रा. राहुरी) आणि कारभारी देवराम गुंड (वय 28, मूळ रा. राहुरी; हल्ली रा. मांजरी, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत किरण बाजीराव चिंधे (रा. टाकळीमिया, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे.

किरण चिंधे हे बँकेत कर्ज काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या क्रेडिट कार्डवर 83 हजारांचे कर्ज असल्याचे त्यांना समजले; परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्ड नव्हते. त्यांनी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेतली असता, नवाब सय्यद याला अटक केली.

सय्यदकडे अधिक चौकशी केली असता, लोकांना बँकेत कर्जप्रकरण मंजूर करण्याच्या बहाण्याने लोकांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड घेत होता. तो अस्लम पठाण आणि पुणे येथील त्याचा साथीदार कारभारी गुंड यांच्याकडून मोबाईल आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड तयार करीत होती. त्यावरून त्यांनी असे लाखो रुपये काढल्याची माहिती दिली.

या प्रकारात ज्याच्या नावाने क्रेडिट कार्ड काढले गेले, त्याला याबाबत कुठलाही थांगपत्ता लागत नाही. बँकेत लोन काढण्यास गेल्यावर ‘सिबिल’ खराब झाल्याची माहिती समजते. अशा प्रकारे अनेक लोकांचे आधार कार्ड, पॅनकार्ड वापरून त्यांच्या नावाने तयार केलेल्या क्रेडिट कार्डद्वारे त्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचे कबूल केले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, विकास साळवे, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रवीण बागुल, प्रमोद ढाकणे, नदीम शेख आदींच्या पथकाने केली.