IPhone साठी एक्स गर्लफ्रेंडचे अपहरण,आईकडे मागितली खंडणी

एका 26 वर्षीय तरुणाने 19 वर्षीय मैत्रिणीचे अपहरण केलं. तिला सोडण्यासाठी त्याने खंडणीची मागणी केली. ही खंडणी त्याने आयफोनसाठी मागितली असल्याची बाब उजेडात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या तरुणीचं त्याने अपहरण केलं, ती त्याची एक्स-गर्लफ्रेंड म्हणजे पूर्वीची प्रेयसी आहे. हा प्रकार पालघरमध्ये घडला आहे. नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपीने गोल्डन नेक्स्ट परिसरातून बुधवारी त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचे अपहरण केले आणि तिच्याच मोबाईलवरून तिच्या आईला फोन केला. आरोपीने तरुणीच्या आईला खंडणी म्हणून आयफोन किंवा रोख रक्कम दीड लाख रुपये पाठव अशी धमकी दिली.

घडलेल्या प्रकारानंतर पीडितेच्या आईने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.पोलिसांनी अपहरणकर्त्याला त्याच फोनवर पुन्हा कॉल केला. त्याने तो कॉल उचलला आणि समोरून कोण बोलतंय हे न विचारता पुन्हा खंडणी मागायला सुरुवात केली.  जेव्हा अधिकाऱ्याने त्याच्या मागणीला प्रतिसाद दिला तेव्हा तो घाबरला आणि पीडीतेला तिथेच एकटे सोडून पळून गेला. पोेलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी आणि पीडितेची जानेवारीमध्ये भेट झाली होती आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात होते.  मात्र सदर घटनेतील आरोपी तरूण हा विवाहित असल्याचे पीडितेला समजल्यानंतर तिने त्याला भेटणे व बोलणे बंद केले. यामुळे संतापलेल्या आरोपीने तिचे काही खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला भेटण्यास भाग पाडले. या प्रकाराला घाबरून ती त्याला एक-दोन वेळा भेटायला गेली. बुधवारी, त्या आरोपीने पीडितेला पुन्हा भेटायला बोलावले आणि तिचे अपहरण करुन तिच्या आईकडे खंडणीची मागणी केली. सदर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.