अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांचा दावा, राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवले

अजित पवार ‘ईडी’ सरकारमध्ये सामील होण्याआधीच 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवून त्याजागी अजित पवार यांची निवड करण्यात आली होती, अशी बाब आता समोर आली आहे. अजित पवार गटाने तसा ई-मेल आज केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला असून 40 आमदारांच्या स्वाक्षऱया असलेले प्रतिज्ञापत्र जोडत अख्खा राष्ट्रवादी पक्ष आणि घडय़ाळ या निशाणीवरही दावा सांगितला आहे. दरम्यान, आमची बाजू ऐकल्याशिवाय पक्ष आणि निशाणीवर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शरद पवार यांच्यावतीने कॅव्हेटद्वारे आयोगाकडे करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडे 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र; दादा म्हणतात, मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, ठरावही मंजूर

मुंबईत 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्या जागी अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ही बैठक कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बोलावली होती, असा दावा करण्यात आला आहे. 40 आमदारांचे अजित पवार यांना समर्थन असून त्यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱया केल्या आहेत, असा दावाही करण्यात आला आहे. त्याआधारे अजित पवार गटाने पक्ष आणि निशाणीवर दावा सांगितला असून 30 जून ही तारीख असलेले हे पत्र आज निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे.

आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आयोग या दोन्ही गटांच्या म्हणण्यावर विचार करून, त्यांनी आयोगाकडे सादर केलेली संदर्भित कागदपत्रे परस्परांनाही द्यावीत असे निर्देश देऊ शकते. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही बाजूंनी राष्ट्रवादी पदाधिकाऱयांची प्रतिज्ञापत्रे तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. ही प्रतिज्ञापत्रेही आयोगाकडे सादर होतील.

आयोग दोन्ही बाजू ऐकणार
निवडणूक आयोगाला अजित पवार गटाचे पत्र मिळाले असून शरद पवार यांचे कॅव्हेटही दाखल करून घेण्यात आलेले आहे. त्यानुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय दिला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

शरद पवारांकडून निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट
पक्ष आणि निशाणीवर अजित पवार यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो, याची कुणकुण लागल्याने शरद पवार आधीच सावध झाले होते. त्यानुसार त्यांच्या सांगण्यावरून जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दोन दिवसांपूर्वीच कॅव्हेट दाखल केलेले आहे. आमची बाजू ऐकल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निशाणीबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचेही जयंत पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे.

दिवसभरात काय घडले…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक झाली. यानंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठकीस पोहचले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अजितदादा समर्थकांची बैठक झाली. यानंतर अजित पवार पुत्र पार्थ आणि जय यांना सोबत घेऊन एमईटी येथील नियोजित बैठकीसाठी रवाना झाले.

वांद्रे येथील एमईटी संकुलात झालेल्या अजितदादा गटाच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीसोबत असल्याची शपथपत्रे भरून घेण्यात आली. बैठक संपल्यावर अजितदादा समर्थक सर्व आमदारांना एका बसमध्ये बसवून ताज हॉटेल येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित आमदारांची बैठक झाली. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मुक्कामी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचे आमदार आणि खासदार यांची बैठक घेतली.