पंजाबच्या पठाणकोटमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, लष्कराकडून घुसखोर ठार

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यानं सोमवारी दिली.

बीएसएफचे अधिकारी म्हणाले की, ‘पठाणकोटमधील सिंबल साकोल गावाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सकाळी 12.30 च्या सुमारास काही संशयास्पद हालचाल दिसली. यानंतर हिंदुस्थानच्या लष्कराकडून घुसखोराला तात्काळ थांबण्यास सांगण्यात आलं, मात्र तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला. अखेर धोका लक्षात घेत जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यात घुसखोर जागीच ठार झाला’.

11 ऑगस्ट रोजी बीएसएफच्या जवानांनी तरनतारन जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला अशाच प्रकारे ठार केलं होतं. पाकिस्तानकडून या भागात वारंवार असे घुसखोरीचे प्रयत्न सुरू असतात. मात्र हिंदुस्थानच्या जवानांच्या दक्षतेमुळे त्यांचे मनसुबे उधळून लावल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे.