आभाळमाया – तू दूर दूर तेथे…!

>> वैश्विक,  [email protected]

20 ऑगस्ट 1977 ची गोष्ट. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने ‘जुळी’ यानं दूरस्थ ग्रहांचं जवळून दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची वैज्ञानिक माहिती ‘याचि डोळा’ (उपग्रहाचा कॅमेरा) प्राप्त करण्यासाठी पाठवायचं ठरवलं. मात्र ही एकत्र जाणारी यानं परस्परांना जोडलेली ‘जुळी’ नव्हती, तर एकाच वेळी उड्डाण करणार असल्याने त्यांना ‘ट्विन’ अशी संज्ञा मिळाली होती. सूर्यमालेच्या (हेलिओस्फिअरच्या) पलीकडे या यानांनी जावं अशी माफक अपेक्षा होती. त्यापैकी ‘व्हॉएजर-1’ काही तांत्रिक बिघाडाने रखडलं आणि ‘व्हॉएजर-2’ ठरल्या तारखेला अवकाशात झेपावलं. ‘व्हॉएजर-1’च्या उड्डाणाला मात्र 5 सप्टेंबर 1977 पर्यंत वाट पाहावी लागली. यापैकी नंतर उडालेल्या ‘व्हॉएजर-1’चं काम झालं?

त्याचंही भलं झालं! आजमितीला 46 वर्षे, 2 महिने आणि 16 दिवस (किंवा जास्तच) ते पूर्णपणे कार्यरत राहिलं. आजही ते सूर्याच्या ग्रहमालेपलीकडचा किपर पट्टा (अशनी, महापाषाणांचा पट्टा) ओलांडून ‘आंतरतारकीय’ (इन्टरस्टेलर) ‘स्पेस’मध्ये काम करतंय. 1977 नंतर त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत, त्यावरचे थ्रस्टर (धक्का देणारी यंत्रणा), ते योग्य त्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी यशस्वीरीत्या वापरून त्याचा मार्ग अबाधित ठेवला. 2017 मध्ये त्यावरचे सर्व चार ‘थ्रस्टर्स’ चेतवून (फायर करून) त्याच्या कक्षेत झालेला किंचित बदलही योग्य केला. 1980 नंतर प्रथमच असं ‘करेक्शन’ करावं लागलं होतं. त्यानंतर पुढची तीन वर्षे त्याने पृथ्वीकडे अव्याहत संदेश पाठवण्याची शाश्वती लाभली. हळूहळू त्याची शक्ती क्षीण होत गेल्यावर त्यावरचे उष्णता निर्माण करणारे ‘हीटर्स’ तसेच इतर बरीच यंत्रणा बंद करावी लागली.  त्यामुळे ऊर्जेची बचत झाली. आता 2025 पर्यंत चालणारी एकच यंत्रणा काम करीत आहे. 1998 पासून त्यावरची अल्ट्राव्हायलेट, स्पेक्ट्रोमीटर, प्लाझ्मा, सबसिस्टम, रेडिओ खगोलशास्त्र यंत्रणा, डेटा टेपरेकॉर्डर, जायरोस्कोप अशा कार्यरत यंत्रणा 2010 पासून क्रमाक्रमाने बंद करण्यात आल्या. उरलेली एक 2025 पर्यंत चालेल आणि ‘व्हॉएजर -1’ आणि ‘2 बी’ यानं साधारण 2036 पर्यंत आपल्या संपर्काच्या आवाक्याबाहेर म्हणजे दूरस्थ अवकाशात (डीप स्पेसमध्ये) प्रवेश करतील!

‘मरिनर’ प्रकल्पातली ही यानं अमेरिकेच्या ‘जेट प्रॉप्ल्शन लॅबोरेटरी’ने बनवली त्या वेळी त्यांचं एवढं गतिमान यश अपेक्षित असलं तरी खात्री  नव्हती, परंतु या यानांनी आपलं ‘विश्व’ आपल्याला अधिकाधिक कसं समजेल याची काळजी घेतली. ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा कमालीच्या विस्तृत, विराट केल्या! आता सर्वसामान्यांना त्याची किती जाणीव असेल कोणास ठाऊक! परंतु शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात खगोलशास्त्र हा विषय केवळ माहिती देण्यापुरता परीक्षा न घेतासुद्धा रंजक पद्धतीने समजावून सांगितला तर केवळ लहानच नव्हे, तर ‘प्रौढ’ विद्यार्थ्यांनाही त्यात आवड निर्माण होईल आणि त्यातून संपूर्ण विश्वाविषयी योग्य जाणिवा निर्माण झाल्या तर कदाचित आपण पृथ्वीवरचे विसंवाद संपवून विराटाचा ध्यास घेऊ. आमच्या ‘खगोल मंडळा’ने त्याबाबतीत अल्पस्वल्प काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आज विज्ञान सांगितलं की, उद्या लगेच वैज्ञानिक तयार होतात असं नाही, पण किमान वैज्ञानिक विचाराला सुरुवात झाली तरी ते मोठं यश असतं. तोही विज्ञानाचाच क्षणोक्षणी वापर करणारे करतातच असं नाही. हा दूरदृष्टीचा, दूरगामी प्रयत्न आहे. ‘व्हॉएजर’ यानांनी ‘तू दूर दूर तेथे, संपर्क मात्र येथे’ असा उत्साही संदेश अप्रत्यक्षपणे दिलाय. त्याचा जरूर विचार करा. आपली जीवनधारणा बदलू शकेल.

आता ‘व्हॉएजर-2’विषयी. पहिल्या क्रमांकाच्या यानाआधीच उडालेलं ‘व्हॉएजर-2’सुद्धा 46 वर्षे, 3 महिने कार्यरत असून तेही आता ‘किपर बेल्ट’ या ग्रहमालेतल्या शेवटच्या टप्प्याच्या पलीकडे गेलेलं आहे. ‘व्हॉएजर-1’चं वजन 815 किलो आणि ऊर्जा उड्डाणसमयी 470 वॉट होती. ते आता 24 अब्ज किलोमीटर म्हणजे सूर्य-पृथ्वी या 15 कोटी किलोमीटर अंतराच्या 162 पट दूर पोहोचलेलं आहे. ‘व्हॉएजर-2’चे उड्डाणावेळचे वजन 721 किलो आणि ऊर्जा 470 वॉटस् होती. आता ते 20 अब्ज किलोमीटर म्हणजे सूर्य-पृथ्वी अंतराच्या 134 पट पार गेले आहे.

1970 मध्येच नासा (किंवा नॅसाने) या संस्थेने गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून इत्यादी ग्रहांपलीकडच्या अवकाशाचा अभ्यास करण्याचा विचार सुरू केला, परंतु ही दोन्ही ‘व्हॉएजर’ यानं भलतीच पराक्रमी निघाली. त्यांनी त्यांना दिलेलं ईप्सित (इच्छित कार्य) तर पूर्ण केलंच, पण अथकपणे त्यांचा प्रवास सुरू आहे. काळाच्या ओघात दोन्ही यानांवरच्या यंत्रणा क्षीण होतील, ऊर्जा मंदावेल आणि ती निष्क्रिय होऊन फिरत राहतील असा कयास होता. त्यानुसार त्यांची ‘वयोमर्यादा’ही ठरली होती, पण 1977 मधल्या आजच्या तुलनेत कमी क्षमता आणि माहितीच्या तंत्रज्ञानावर आधारित असूनसुद्धा ही दोन्ही यानं अपूर्व यश मिळवत आहेत. त्यांच्याकडून अजूनही क्षीण का होईना, पण संदेश येत आहेत. 2030 पर्यंत तरी ते येतील अशी अपेक्षा आहे. एखाद्या शतायुषी व्यक्तीने जिद्दीने मॅरेथॉन जिंकावी तसं हे भारावून आणि हेलावून टाकणारं यश आहे. त्यासाठी सर्व संबंधित संशोधक, शास्त्रज्ञांविषयी आपण कृतज्ञ असायला हवं. या यानांवर आधी म्हटलंय तशी केवळ वैज्ञानिक उपकरणंच आहेत असं नाही, तर ‘धूमकेतू’चा साठा असलेल्या ‘उर्ट’ क्लाऊडच्या पलीकडे ही यानं गेली आणि ग्रहमालेपलीकडच्या कोण्या ग्रहावरच्या बुद्धिमानांशी त्यांचा संपर्क आला तर पृथ्वी नावाच्या ग्रहावर काय आहे याची नोंद ही यानं घेऊन गेली आहेत. आपल्या या ग्रहाची नैसर्गिक रचना, त्यावरील माणूस नावाचा ‘प्रगत’ प्राणी आणि त्याचे कलाविष्कार यांचाही समावेश त्यात आहे. दोन्ही यानांवरच्या सुवर्ण तबकडय़ांवर (गोल्डन डिस्क) जे मानवी संगीत आहे, त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या केसरबाई केरकर यांच्या स्वरातली ‘जात कहां हो’ ही भैरवीसुद्धा आहे. यूटय़ूबवर हा दूर अंतराळात गेलेला स्वर तुम्हीही ऐकू शकता.