दिल्ली डायरी -‘सेमिफायनल’ हरणारच; ‘फायनल’चे काय?

>>नीलेश कुलकर्णी,  [email protected]

लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमिफायनलम्हटल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल फुंकले गेले आहेत. गेल्या वेळी भाजपचा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत सुमारे 60 जागा जिंकून लोकसभेत बहुमताचा आकडा गाठला होता. या वेळी नेमकी परिस्थिती उलटी आहे. शिवाय भाजपमधील सुंदोपसुंदीदेखील उघड झाली आहे. त्यामुळे भाजप ही  सेमिफायनल हरलाच आहे, पण त्यांना लोकसभेच्या फायनलसाठी तयारी करावी लागणार आहे. भाजप नेत्यांची बॉडी लॅंग्वेजतेच सांगत आहे.

राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवडता प्रचार सभांचा धडाका अजून सुरू झालेला नाही. गेल्या आठवडय़ात मोदी उत्तराखंडमधील पवित्र अशा पार्वती मंदिरात ‘ध्यानस्थ’ दिसले. आता पितृपक्ष संपल्यानंतर ते प्रचारात उतरतील. सेमिफायनलसह फायनलही सोपी असणार नाही याची पंतप्रधानांना जाणीव आहे. त्यामुळेच बहुधा ध्यानधारणेतून तावूनसुलाखून निघत पुन्हा राजकीय संघर्षाला सुरुवात करण्याचा त्यांचा मनोदय असावा. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या तिन्ही राज्यांत सपशेल पराभव झाला होता. आताही या तिन्ही राज्यांत भाजपचा सुफडा साफ होण्याचा अंदाज आहेच. ‘गोदी मीडिया’ची एक्सपर्ट मंडळीही तेच सांगत आहे. जनमानस प्रचंड विरोधात आहे म्हणूनच मध्य प्रदेश व राजस्थानात प्रत्येकी सात खासदारांना भाजपने विधानसभेच्या मैदानात उरतविले आहे. स्वतःच्या जागेशिवाय इतर दोन आमदार निवडून आणण्याची जबाबदारी या खासदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे थोडीफार इभ्रत वाचेल, पण लोकसभेचे काय? हा प्रश्न आहेच. अर्थात 2019 मध्येही भाजपविरोधात असेच वातावरण होते. तीन राज्ये गमावल्यानंतर केंद्रातही मोदी सरकार येणार नाही, असे बोलले जात असतानाच पुलवामा घडले. त्यानंतर देशात एक ‘नरेटिव्ह’ सेट करण्यात आला. देशप्रेमाच्या लाटेवर स्वार होत मोदी सरकार पुन्हा बहुमत मिळवून सत्तेत आले हाही इतिहास आहे. त्यामुळे पाच राज्यांची विधानसभा निवडणूक हरल्यावर भाजपतर्फे कोणती नवी शक्कल लढविली जाते, याकडेही देशाचे लक्ष असेल. पुलवामासारख्या घटना पुन्हा घडू शकतात अशी भविष्यवाणी माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी केलेली आहेच. त्यामुळे नेमके कोणते नरेटिव्ह देशापुढे येते, हेही पहावे लागेल. मध्य प्रदेश व राजस्थानची सत्ता गेल्यानंतर वसुंधराराजे व शिवराज यांची त्या त्या राज्यातील मक्तेदारी संपुष्टात येईल. फार तर या मंडळींचे राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन होऊ शकेल. त्यामुळेच सेमिफायनलपेक्षा ‘फायनल’ इंटरेस्टिंग ठरणार आहे.

चतुर खिलाडी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना दिल्लीकरांनी अलगद अडगळीत टाकले असले तरी हार मानतील ते शिवराजसिंग कसले? शिवराज यांनी एक धूर्त राजकीय खेळी करत दिल्लीकरांनाच ‘मामा’ बनविणे सुरू केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशात अगदी चमत्कार वगैरे झाला आणि भाजपची जर सत्ता आली तरी दिल्लीकर काही आपल्याला मुख्यमंत्री बनू देणार नाहीत हे न कळण्याइतपत शिवराजमामा दुधखुळे नक्कीच नाहीत. अगदी पितृपक्षात त्यांची उमेदवारी जाहीर करून दिल्लीकरांनी त्यांना ‘अशुभ संकेत’ दिलेच आहेत. मात्र त्यावर पलटवार करत मामा माहौल बनवत आहेत. आता प्रत्येक जाहीर सभेत मामा जनतेला नरेंद्र मोदी स्टाईलने प्रश्न विचारत आहेत, ‘‘शिवराज को सीएम बनना चाहिए या नही?’’ पाठोपाठ चतुर मामा जनतेला दुसरा प्रश्न विचारतात, ‘‘नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनना चाहिए या नही?’’ या प्रश्नाला तर जनतेच्या मनात ‘ना’च आहे, इतकी जनता विटली आहे. मात्र करते काय? उत्तरे ही जाहीर सभेतली ‘भक्त मंडळी’ देत असल्याने जनतेला ‘हो’मध्ये ‘हो’ मिळवावे लागते. शिवराजमामांनी अशा प्रकारे प्रचार सुरू करून थेट दिल्लीकरांनाच आव्हान दिले आहे. त्यात सध्या ओबीसी आरक्षण व जातीनिहाय जनगणनेची मागणी जोर धरत आहे. या दोन्ही बाबीही मामांच्या पथ्यावर पडत आहेत. शिवराजसिंग यांना राजकारणातला चतुर सुजान खिलाडी म्हणतात ते म्हणूनच!

बघेल यांचा ‘कॅण्डी क्रॅश’

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्याचे झाले असे की, छत्तीसगढमध्ये चांगले सरकार चालविणाऱ्या बघेलांचा मोबाईलवर ‘कॅण्डी क्रॅश’ खेळतानाचा फोटो भाजपच्या मंडळींनी व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत बघेल हा ‘गेम’ खेळत असल्याचे पाहून भाजपने ‘छत्तीसगढची सत्ता जाणारच आहे. त्यामुळे फावला वेळ मिळणार आहे. त्याची सुरुवात या मनोरंजनाने सुरू झाली आहे’, अशी टीका केली. काँग्रेसनेही त्यावर पलटवार केला आहे. ‘मी मोबाईल गेम खेळेन, विटीदांडूही खेळेन. मला जे आवडेल ते करेन. कारण विरोधकांना माझाच प्रॉब्लेम आहे. त्यांना मी नकोच आहे,’ असे सांगत बघेल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेस डोळे झाकून निवडणूक जिंकेल असे वातावरण आहे. मात्र असे असले तरी नेतृत्वाने कदापिही गाफील असता कामा नये. भूपेश बघेल हे चांगले मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळवून आहेत. त्यांच्या कामात विरोधकांनी जेवढे कोलदांडे घातले नाहीत तेवढे त्यांच्या वडिलांनी वादग्रस्त विधाने करून घातले. मात्र तरीही बघेलांनी चांगले सरकार चालवले. आताही तेच सत्तेवर येतील, असे सर्व्हे सांगत आहेत. मात्र अशी स्थिती असली तरी निवडणूक बैठकांचे गांभीर्य नेत्यांनी राखलेच पाहिजे. ‘कॅण्डी क्रॅश’ खेळणे हा काही गुन्हा नाही. कुठलाही राजकीय नेता किंवा मुख्यमंत्री हा शेवटी माणूस असतो. त्यालाही काही विरंगुळ्याचे क्षण हवहवेसे वाटतात. ते स्वाभाविकच आहे. मात्र स्वतःचे व पक्षाचे हसू होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.