बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातील गैरप्रकाराविषयी राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल

बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीवेळी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मंगळवारी केला होता. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून त्यांनी या गैरप्रकाराचे व्हिडीओही अपलोड केले होते. या गैरप्रकाराचा खुलासा झाल्याची पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स पोस्टवरून करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स पोस्टवरून या गैरप्रकाराचा खुलासा झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ते म्हणाले, अखेर सत्य समोर आलंच. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे निवडणूक यंत्रणेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे येथील शाखा रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीनेच सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर निवडणूक यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तपासणीत ऐन 12 वाजता बँकेत 40-50 व्यक्तींकडून संशयास्पद हालचाली होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेत सुरू असणाऱ्या हालचाली, बँकेचे शाखा व्यवस्थापक विनायक तेलावडे यांनी भरारी पथकाला बँकेतील सिसिटीव्ही फुटेज देण्यास केलेली टाळाटाळ, व्यवस्थापकांकडून संपर्क क्रमांक बंद ठेवणे यावरून सगळं काही स्पष्ट झालं आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हा आचारसंहितेचा भंग नव्हे तर हत्या असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘मतदानाच्या काही तास अगोदर अशाप्रकारे कृत्य घडणं हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही तर थेट हत्याच आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी या सर्व यंत्रणांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वेल्हे शाखा व्यवस्थापक विनायक तेलावडे यांच्यावर कारवाई करावीच. परंतु त्याचसोबत बँक सुरु ठेवण्याचे आदेश नेमके कुणी दिले ? बँकेच्या आत नेमके काय सुरु होते ? याचाही सखोल तपास करून संबंधितांवर तातडीने सक्त कारवाई करावी, अशी मागणी या पोस्टमधून करण्यात आली आहे