निर्मळ आनंद देणारा संगीतकार-वादक

आपल्या सदाबहार वादनाने रसिकांना संगीताचा मनमुराद आनंद देणारे संगीतकार-वादक निर्मल मुखर्जी यांनी जानेवारी महिन्यात या जगाचा निरोप घेतला. निर्मल मुखर्जी आज आज आपल्यात नसले तरी त्यांच्या पश्चातही त्यांनी वादन केलेली अनेक गाणी त्यांच्या नावाप्रमाणेच संगीतप्रेमींना ‘निर्मळ’ आनंद देणार आहेत. त्यांच्या याच गाण्यांच्या आठवणी आणि संगीतमय प्रवासातील स्मृती जागविण्यासाठी निर्मल यांचे जोडीदार संगीतकार-वादक अरविंद हळदीपूर यांनी पुढाकार घेऊन ‘तेरे जैसा यार कहां’ या चॅरिटी शोचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोळा होणारा सर्व निधी निर्मल यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

निर्मल मुखर्जी आणि अरविंद हळदीपूर यांच्यातील मैत्रीचं नातंही असंच होतं. निर्मल यांच्या पश्चातही अरविंद यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले ऋणानुबंध अबाधित आहेत. हेच ऋणानुबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने हळदीपूर यांनी ‘तेरे जैसा यार कहां’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 27 जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये रात्री 8 वाजता ‘तेरे जैसा यार कहां’ हा चॅरिटी शो होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा आणि संगीतकार राजेश रोशन या चॅरिटी शोला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात सुदेश भोसले, जॉली मुखर्जी, मोहम्मद सलामत, राज अनमोल, प्रियांका मित्रा, श्रीजीत, निरुपमा डे, आलोक काटधरे, उज्जयिनी रॉय, संदीप शाह आदी गायक गाणी सादर करतील. यावेळी अनेक सुमधुर गीतांची रसिकांना पर्वणी मिळेल. 40 वादकांच्या सहाय्याने हळदीपूर स्वतः या शोचे संगीत संयोजन करणार आहेत. कमली एंटरटेन्मेंट आणि स्वर आलाप यांच्या सौजन्याने हा म्युझिकल शो सादर होणार आहे.

 12 हजारांहून अधिक गाण्यांना साथ

निर्मल मुखर्जी आणि अरविंद हळदीपूर या जोडीने मराठीसह हिंदी संगीत क्षेत्रातही बहुमूल्य योगदान दिले आहे. गणेशोत्सवामध्ये हमखास वाजणारे सुपरडुपर हिट अशी चिक मोत्यांची माळ…’ हे गाणे याच जोडीने संगीतबद्ध केले आहे. निर्मल मुखर्जी हे लक्ष्मीकांतप्यारेलाल यांचे आवडते वादक होते. ‘जीने की राहया चित्रपटातील लक्ष्मीकांतप्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमध्ये निर्मल यांनीच कोंगो वाजवला आहे. 1967 मध्ये आलेल्या दो रास्तेचित्रपटात त्यांनी वाजवलेला मटका फेमस आहे. 1968 मध्ये आलेल्या हमजोलीया चित्रपटातील ढल गया दिन, हो गयी शाम…’ या गाण्यात त्यांनी बॅडमिंटन शटलचा स्पेशल आवाजही काढला होता. निर्मल यांनी संगीत दिग्दर्शक रामलक्ष्मण यांच्यासोबत  दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसाठी काम केले. संगीत क्षेत्रातील 60 वर्षांच्या कालावधीत त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी वाजवली आहेत. मराठी  इंडस्ट्रीमध्ये निर्मल यांनी श्रीकांत ठाकरे, पं. हृदयनाथ मंगेशकर, राम कदम, श्रीधर फडके ऊर्फ बाबूजी आणि अनिलअरुण या दिग्गजांसोबत काम केले आहे.