ओडिशाच्या धर्तीवर राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात द्या! बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाची शासनदरबारी मागणी  

कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी ओडिशा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्यातील वृत्तपत्र विव्रेत्यांना मदत करावी, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाच्या वतीने शासनदरबारी करण्यात आली आहे.

कोरोनाची साथ चालू असताना वृत्तपत्र विव्रेत्यांनी जिवाचा धोका पत्करून वृत्तपत्रांचे वितरण चालू ठेवले. विश्वासार्ह माहितीचा स्रोत म्हणून वाचकांनीसुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातून प्राप्त होणारी माहिती जास्त महत्त्वाची मानली. वाचक आणि वर्तमानपत्र यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असणारा वृत्तपत्र विव्रेता म्हणूनच फार महत्त्वाचा घटक आहे, हे जाणून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपल्या राज्यातील वृत्तपत्र विव्रेत्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच अपघातासाठी आर्थिक कवच व अपघाती मृत्यू झाल्यास विव्रेत्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील वृत्तपत्र विव्रेत्यांनादेखील मदत करण्यात यावी, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे प्रतिनिधी हरी पवार, संजय चौकेकर, मधुसूदन सदडेकर आणि बाळा पवार यांनी शासनदरबारी केली आहे.