वर्ल्ड कपचे सामने हुकलेल्या मैदानांवर द्विपक्षीय मालिका, बीसीसीआय सचिवांची ग्वाही

हिंदुस्थानातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने केवळ दहा मैदानांवर आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या मैदानांना सामने मिळाले नाही त्या राज्य संघटनांनी आपली थेट नाराजी बीसीसीआयकडे व्यक्त केली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी द्विपक्षीय मालिकांचे आयोजन करू अशी ग्वाही ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच ‘बीसीसीआय’ने विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या 10 राज्य संघटनांना द्विपक्षीय मालिकांचे आयोजन करण्यापासून माघार घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गेल्या आठवडय़ात क्रिकेट संघटनांना पत्र लिहून या सर्व राज्य क्रिकेट संघटनांना द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेदरम्यान सामन्यांचे आयोजन न करण्याची विनंती केली होती.  हिंदुस्थानात होणारा आगामी वर्ल्ड कप 10 मैदानांवर होणार असून 2 शहरांमध्ये सराव सामने होतील. मात्र ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी 27 जून रोजी सर्व क्रिकेट संघटनांना याबाबत विनंती केली होती. ज्यावर सर्व क्रिकेट संघटनांनी सहमती दर्शवली होती.

मोहाली, नागपूरला होणार सामने

वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून हिंदुस्थानात वाद निर्माण झाला. एकेका स्टेडियमला 5-5 सामने दिले अन् आमच्याकडे दुर्लक्ष केले, असे काही राज्य संघटनेचे म्हणणे होते.  विशेषतः मोहाली, इंदूर आणि तिरुवनंतपुरमला वर्ल्ड कपचे सामने न मिळण्याने तेथे आंदोलन करण्यात आले, मात्र बीसीसीआयच्या निर्णयानंतर या पेंद्रांवर द्विपक्षीय मालिकेदरम्यान एकदिवसीय सामने आयोजित करण्याच्या आशा वाढल्या आहेत. याचबरोबर रांची, इंदूर, मोहाली, नागपूर या मैदानांनाही यजमानपद देण्यास प्राधान्य मिळू शकते.