सेच्युरियनवर फडकला तिरंगा; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत हिंदुस्थानने घडवला इतिहास

दक्षिण आफ्रिकेचा गड असलेल्या सेंच्युरियन मैदानावर हिंदुस्थानने अखेर तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला. पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान संघाला 113 धावांनी धूळ चारून टीम इंडियाने या मैदानावरील पहिला कसोटी विजय मिळवत इतिहास घडवला. पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला. याचबरोबर हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

आजी-माजी कर्णधारांची झुंज

दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसाच्या 4 बाद 94 धावसंख्येवरून गुरुवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र या धावसंख्येत केवळ 20 धावांची भर घालून यजमान संघाचा दुसरा डाव 68 षटकांत 113 धावसंख्येवर कोसळला अन् विराट कोहलीच्या सेनेने नववर्षाच्या एक दिवस आधीच हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांना जल्लोष करायला लावला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार डीन एल्गर (77) आणि माजी कर्णधार टेंबा बावुमा (नाबाद 35) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजांचा काही वेळ प्रतिकार केला. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी
37 धावांची भागीदारी केली, मात्र बुधवारचा दिवस गाजवणाऱया डीन एल्गरला अखेरच्या दिवशी खेळपट्टीवर फाळ काळ तग धरता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याला पायचित पकडून हिंदुस्थानला मोठे यश मिळवून दिले. एल्गरने 156 चेंडूंत 77 धावा करताना 12 चेंडू सीमापार पाठवले.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियानंतर हिंदुस्थानने भेदला गड

सेंच्युरियन मैदान म्हणजे यजमान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा गड मानला जातो. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 27 कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने केवळ तीनच पराभव स्वीकारले. याआधी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या संघांनी यजमान संघाला सेंच्युरियन मैदानावर केवळ एकेकदा पराभूत केलेले आहे. आता हिंदुस्थाननेही दक्षिण आफ्रिकेचा हा गड भेदला. इंग्लंडने या मैदानावर तीन कसोटी ड्रॉ केलेल्या आहेत. म्हणजेच या मैदानावर 27 पैकी 21 कसोटींत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारलेली आहे. सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेला हरवणारा हिंदुस्थान हा पहिलाच आशियाई संघ ठरला हे विशेष.

दृष्टिक्षेपात

  • हिंदुस्थानचा दक्षिण आफ्रिकेत चौथा कसोटी विजय.
  • दक्षिण आफ्रिकेत हिंदुस्थानने सलग दुसरी कसोटी जिंकली. याआधी 2018 मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेली अखेरची कसोटी हिंदुस्थानने 28 धावांनी जिंकली होती.
  • सर्वाधिक 56 मैदानांवर कसोटी जिंकून हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाची बरोबरी केली.
  • विराट कोहली सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार.

धावफलक

हिंदुस्थान पहिला डावः 327 धावा.

दक्षिण आफ्रिका पहिला डावः 197 धावा.

हिंदुस्थान दुसरा डावः 174 धावा.

दक्षिण आफ्रिका दुसरा डावः एडेन मार्करम त्रि. गो. शमी 1, डीन एल्गर पायचित गो. बुमराह गो. 77, कीगन पीटरसन झे. पंत गो सिराज 17, रॅस्सी वॅन दर डुसेन त्रि. गो. बुमराह गो. 11, केशव महाराज त्रि. गो. बुमराह 8, टेंबा बावुमा नाबाद 35, क्विंटॉन डिकॉक त्रि. गो. सिराज 21, विआन मुल्डर झे. पंत गो. शमी 1, मार्को जॅन्सेन झे. पंत गो. शमी 13, कॅगिसो रबाडा झे. शमी गो. अश्विन 0, लुंगी एनगिडी झे. पुजारा गो. अश्विन 0. अवांतरः 7; एकूण 68 षटकांत 191 धावा.

गोलंदाजीः जसप्रीत बुमराह 19-4-50-3, मोहम्मद शमी 17-3-63-3, मोहम्मद सिराज 18-5-47-2, रविचंद्रन अश्विन 9-2-18-2.