काही कळायच्या आतच ऋषिका रेनकोटमधून निसटली, आजोबांचा आक्रोश

मुसळधार पावसामुळे ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान गाड्या ठप्प झाल्या होत्या. अखेर आम्ही अंबरनाथ लोकलमधून खाली उतरलो आणि सहा महिन्यांच्या चिमुकल्या ऋषिकाला कडेवर घेऊन नाल्याच्या बाजूने कल्याण स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. मात्र अचानक रेनकोटमधून ती कधी निसटली व नाल्यात पडली हे कळलेच नाही. डोळ्यांदेखत माझी नात वाहत जात होती… हे सांगताना आजोबा ज्ञानेश्वर पोगूल यांना हुंदका आवरेनासा झाला, तर ऋषिकाची आई योगिता रुमाले हिच्या तर अश्रूंचा पूर अजूनही थांबलेला नाही. एनडीआरएफने तब्बल सहा तास शोधकार्य केल्यानंतरही ऋषिकाचा ठावठिकाणा न लागल्याने रुमाले व पोगूल कुटुंबाचे भावविश्वच हरपले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

बुधवारी दुपारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या ट्रॅकवरच खोळंबल्या होत्या. चिमुकली ऋषिका हिला जन्मत:च आजार असल्याने उपचारासाठी तिला मुंबईतील रुग्णालयात नेले होते. अंबरनाथ लोकलमधून कल्याणपर्यंत जायचे व नंतर रिक्षाने भिवंडीतील घर गाठण्याचा ज्ञानेश्वर पोगूल यांचा विचार होता. पण कल्याण स्टेशनच्या आधीच लोकल दोन तास रखडली. अनेक प्रवासी रुळावरून चालत जात होते. ज्ञानेश्वर पोगूल हे देखील आपली मुलगी योगिता रुमाले व ऋषिका हिला घेऊन खाली उतरले व रुळावरून चालू लागले.

■ नेमकी घटना कशी घडली हे सांगताना पोगूल म्हणाले, ट्रॅकवरून जात असताना माझ्या मुलीचा म्हणजे योगिताचा पाय घसरला. तिला कसेबसे सावरले. याच दरम्यान माझ्या नातीला मी रेनकोटमध्ये गुंडाळून हातात घेतले, पण अचानकपणे ती घसरून नाल्यात पडली. काय झाले हे कळण्याच्या आतच ऋषिका वाहून गेली आणि सारे संपले.