पुलाच्या चुकीच्या कामांमुळे नागरिक हैराण; बंगळुरू महामार्गावर शिवसेना, काँगेसची निदर्शने

सध्या महामार्गाचे करोडो रुपयांचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी जुने पूल पाडून मोठमोठे पूल बांधले जात आहेत. मात्र, पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंचगाव येथील माळीवाडा पुलाची उंची वाढविण्यासाठी निवेदने देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सातारा-कागल रस्त्याच्या चारपदरीकरणावेळी पूल व रस्ता करताना करण्यात आलेल्या अनेक चुकांमुळे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आसपासच्या गावातील नागरिक त्रास भोगत आहेत. याविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली.

सातारा ते कागल हायवे रस्त्याच्या सध्या सहापदरीकरणाचे काम चालू आहे. यापूर्वी चारपदरीकरणावेळी पूल व रस्ता करताना केलेल्या चुकांमुळे गेल्या 15 ते 20 वर्षे गावातील नागरिक त्रास भोगत आहेत. हुपरीला जाणारा उचगाव महामार्ग पूल व तावडे हॉटेल मुख्य पूल याची उंची व रुंदी कमी ठेवल्याने तसेच वाहतुकीच्या कोंडीमुळे उंचगावसह आसपासच्या गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सहापदरीकरणाच्या कामामुळे माळीवाडा पुलापलीकडे उचगावातील सुमारे 400 ते 500 एकर शेत, जमीन, शाळा, कॉलेज असल्याने पुलाखाली सतत वर्दळ आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी नेताना तसेच उसाने भरलेली ट्रक्टर ट्रॉली जात नसल्याने त्यांना अर्धा किलोमीटर फिरून हुपरी महामार्ग पुलाखालून जावे लागत आहे. त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी होते. आता या पुलाची उंची, रूंदी वाढविणार नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह शेतकरी आणि ग्रामस्थांकडून आज या पुलावर निदर्शने करण्यात आली. यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, दीपक रेडेकर, सुनील पोवार, विक्रम चौगुले, दीपक पाटील, महेश जाधव, विराग करी, संतोष चौगुले, सुनील चौगुले, सचिन नागटिळक, संजय निगडे, दत्ता फराकटे, उत्तम अडसुळे, कैलास जाधव आदी उपस्थित होते.