चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या

शेताच्या वादातून आपल्या पतीचा खून करण्यात आल्याची फिर्याद देणाऱ्या पत्नीनेच त्याचा खून केल्याची घटना लातूरमध्ये  उघडकीस आली आहे. चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करत असल्याने पत्नीने पतीचा खून केलेला.

अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमधील जोडजवळा येथे राहणाऱ्या एका महिलेने “शेताच्या वादातून त्यांच्या पतीचा नात्यातील इसमाने डोक्यावर कोयत्याने मारून खून केला.” अशी तक्रार खुन करणाऱ्या इसमाच्या नावासह दिली होती. त्यावरून पोलीस ठाणे गातेगाव गुन्हा नोंद क्रमांक 108/2023 कलम 302 अन्वये नोंद करण्यात आला होता. आणि पोलिसांनी फिर्याद मध्ये नमूद इसमास तात्काळ अटक केली होती.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यानंतर गुन्ह्याच्या कारणाची व इतर बाबींचा तपास करीत असताना मोठ्या प्रमाणात विसंगती दिसत होती. यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यासंदर्भात पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते. त्याअनुषंगाने सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते.

खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीनेच तिची आई व आणखीन दोन पुरुषांच्या मदतीने पतीचा खून केल्याचे मान्य केले. मयत हनमंत कटारे हा त्याची पत्नी पूजा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करीत होता. या सततच्या मारहाणीला/त्रासाला कंटाळून आई व इतर दोन पुरुषाच्या सहाय्याने पतीचा खून करून तो खून दुसऱ्या एका इसमानेच केल्याचा बनाव रचल्याचे कबूल केले.

पोलीस पथकाने गुन्ह्यातील राजेंद्र विद्याधर नितळे (54 वर्ष), दत्तात्रय नागनाथ लोंढे (55), निर्मला पांडुरंग दयाळ(50) पूजा हनमंत कटारे (30) यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गातेगाव पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गातेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानदेव सानप , स्थानिक गुन्हे शाखेचे प्रवीण राठोड ,पोलीस अमलदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, राजेश कंचे, बंटी गायकवाड, प्रदीप चोपणे, शिरीष पाटील ,वाल्मीक केंद्रे, दशरथ गिरी, रामदास नाळे, जीवन राजगीरवाड, अतुल पतंगे, संजय मोरे यांनी केली आहे.