लोकमान्यांनी गुलामगिरी विरोधात लढा दिला, मोदींचे उद्गार

लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्य- लढय़ाच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहेत. त्यांचा भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास होता. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी समाज उभा केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरोधात आवाज उठवून लढा दिल़ा  देशवासीयांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे लोक पुढे येऊन स्वातंत्र्यासाठी प्रोत्साहित झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हिंद स्वराज ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणोती टिळक हे उपस्थित होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानचिन्ह आणि 1 लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मोदी यांनी हा धनादेश नमामी गंगे प्रकल्पासाठी दिल्याचे जाहीर केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा कुठलाही पुरस्कार मिळतो तेव्हा जबाबदारी वाढते. मला मिळालेल्या पुरस्काराशी लोकमान्य टिळकांचे नाव जोडले आहे.  हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान आणि घटना शब्दांत मांडता येणार नाहीत. भारतीयांची श्रद्धा, संस्कृती या सर्व मागासलेपणाचे प्रतिक आहेत, असा समज ब्रिटिशांनी केला होता. पण लोकमान्य टिळकांनी इंग्रजांचे मत चुकीचे ठरविले. लोकमान्यांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी जेवढा आनंदाचा क्षण आहे तेवढाच भावनिक देखील आहे. लोकमान्य टिळकांच्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती असे उत्सव सुरू करून स्वातंत्र्य चळवळीला सामाजिक बळ दिले. केसरी वर्तमानपत्र आणि मराठा साप्ताहिक सुरू करून गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवून मोठा लढा दिला. देशवासीयांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे देशातील लोक पुढे येऊन स्वातंत्र्यासाठी प्रोत्साहित झाले. टिळकांचे आणि गुजरातचे विशेष नातं आहे. टिळक जेव्हा अहमदाबाला आले होते तेव्हा चाळीस हजार लोकांनी त्यांचे स्वागत केले होते. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल देखील सहभागी असल्याचा दाखला मोदी यांनी दिला. डॉ. दीपक टिळक यांनी प्रस्ताविक केले.

शिंदेंना नमस्कार तर अजितदादांच्या खांद्यावर थाप

पुरस्कार कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मोदी हे जाण्यास निघाले तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी उपस्थितांची जागेवर जाऊन भेट घेतली. जाताना उजव्या बाजूला उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नमस्कार केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करताना त्यांच्या खांद्यावर थाप टाकली. यावेळी अजित पवारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

मोदींचे भाषण सुरू असताना शिंदेंचा डोळा लागला!

पुरस्कार वितरण सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चक्क झोपले. शिंदेंच्या डुलक्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. भाषणाच्या सुरुवातीला मोदींनी व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांची नावे घेतली. त्यावेळी शिंदेंची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. मोदींनी अजित पवारांचे नाव घेतले तेव्हा शिंदे जागे झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.