MP Election – कमलनाथ छिंदवाडातून रिंगणात, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांपुढे रामायणातील ‘हनुमान’चे आव्हान

लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने तारखाही जाहीर केल्या आहेत. छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम, तेलंगणासह मध्य प्रदेशमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ छिंदवाडातून निवडणूक लढणार आहेत, तर दुसरीकडे बुधनी येथून मैदानात उतरलेल्या शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधातही काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. काँग्रेसने बुधनी मतदारसंघातून अभिनेते विक्रम मास्ताल यांना तिकीट दिले आहे. 2008मध्ये आलेल्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत विक्रम मास्ताल यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्यापुढे मोठे आव्हान असणार असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंद सिंह हे देखील विधानसभा निवडणूक लढणार आहेत. लाहर येथून ते निवडणूक लढतील. तर इंदूर-1 या मतदारसंघात काँग्रेसने भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्याविरोधात संजय शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. शुक्ला यांची ही पारंपारिक सीट असून ते विद्यमान आमदारही आहेत. इंदूर-2 या मतदारसंघातून चिंतामणी चौकसे चिंटू, इंदूर-4 मतदारसंघातून राजा मधवानी, चूरहट मतदारसंघातून अज सिंह राहुल, चांचौडा मतदारसंघातून दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह आणि राघोमढ मतदारसंघातून दिग्विजय सिंह यांचे सुपुत्र जयवर्धन सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसने छत्तीसगडमध्ये 90 आणि तेलंगाणामध्ये 40 जागांसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही पहिली यादी जाहीर केली आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटनमधून निवडणूक लढतील. ते पाटनचे विद्यमान आमदार आहेत. तर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव हे अंबिकापूर येथून निवडणूक लढणार आहेत. तेलंगाणामध्ये प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी हे कोडनगर मतदारसंघातून नशिब आजमावताना दिसतील.