चोऱ्या करण्यासाठी पुण्याहून येतो, मुंबईत नातेवाईकांच्या खात्यात वळवले पैसे

गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरून त्यातील ई वॉलेटमधील रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वळवणाऱया ठगाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. सागर सारसर असे त्याचे नाव आहे. तो चोऱया करण्यासाठी एक्सप्रेसने मुंबईत येतो. चोऱया केल्यानंतर तो मौजमजा करण्यासाठी पुन्हा पुण्याला जातो.

तक्रारदार हे चकाला येथे राहतात. गेल्या आठवडय़ात ते केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेले होते. पैसे देण्यासाठी त्याने खिशात हात घातला, तेव्हा त्याचा मोबाईल खिशात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर ते एटीएममध्ये गेले. तेव्हा त्याच्या खात्यातून 61 हजार रुपये काढल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरीप्रकरणी त्याने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रणजित गुंडरे, उपनिरीक्षक आव्हाड, मोनिका गोम्स, नीलम लब्दे, शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

फसवणुकीचे पैसे हे पुण्यातील एका खात्यात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या खातेधारकाची माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी बँकेत जाऊन सापळा रचला. सागर हा पैसे काढण्यासाठी बँकेत येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सागर हा मूळचा पुण्याचा रहिवासी असून त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याला मोबाईल तंत्रज्ञानाबाबत माहिती आहे. तो सतत यूटय़ूबवर चोऱया करण्याबाबत व्हिडीओ पाहत असायचा. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी करतो चोरी
सागर हा चोरी करण्यासाठी मुंबईत येतो. गर्दीच्या ठिकाणी तो नागरिकांच्या खिशातील मोबाईल चोरतो. चोरलेल्या मोबाईलमध्ये तो पासवर्ड पुन्हा रीसेट करतो. त्यानंतर त्या मोबाईलमधील ई-वॉलेटमधील रक्कम स्वतः आणि काही रक्कम नातेवाईकाच्या खात्यात वर्ग करतो अशी त्याची गुह्याची पद्धत आहे. चोरी केल्यानंतर रात्री एक्सप्रेस पकडून पुण्याला जातो. तेथे गेल्यावर चोरीच्या पैशातून तो मौजमज्जा करतो.

काय काळजी घ्याल…
अनेक नागरिक हे त्यांच्या एटीएम, क्रेडिट कार्डचा पासवर्ड आणि कार्डचा फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवतात. असे फोटो मोबाईलमध्ये ठेवू नयेत. मोबाईल चोरांच्या हाती लागल्यास ते सहज ई-वॉलेटच्या माध्यमातून पैसे काढू शकतात.