मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’

गणराज स्टुडिओ प्रस्तुत श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा मराठीसह इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या सिनेमाचे निर्माता आहेत. यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित भानुशाली यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते या सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत. सिनेमात कलाकार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. श्रेयश जाधव यांनी यापूर्वी ‘मी पण सचिन’, ‘फकाट’ असे जबरदस्त सिनेमा सिनेसृष्टीला दिले आहेत. लवकरच त्यांचा ‘डंका हरिनामाचा’, ‘जंतर मंतर छू मंतर’ हे सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.