साखरपुड्यातच आटोपले शुभ-मंगल सावधान! ठेंगे पाटील व माने कुटुंबाने ठेवला आदर्श

>>प्रसाद नायगावकर

मुलगी उपवर झाली की पित्याला तिच्या लग्नाची काळजी लागते. मुलीला बघायला येणाऱ्या वर व त्याच्या कुटुंबाचे हुंड्यासह विविध अपेक्षांनी वधू पित्यांची चिंता वाढते. मानपान, देणे घेणे यासाठी वधूपित्याची कोंडी होते. वधू पित्याला वराकडील मंडळीची बडदास्त करावी लागते. या सर्व प्रथा बाजूला सारून यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपुरातील ठेंगे पाटील परिवाराने हुंडा न घेता व माने परिवाराने हुंडा न देता साखरपुड्यातच विवाह सोहळा आटोपून पुरोगामी विचारांचा समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

वायफना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील पूजा ही ब्रम्हानंद रंगराव माने यांच्या कुटुंबातील उच्चशिक्षण घेतलेली मुलगी. तर श्रीरामपूर येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. गणेश तुकाराम ठेंगे पाटील यांचा एम. कॉम.,एम.ए.,बी.एड्. व एम.बी.ए. असे उच्च शिक्षण घेतलेला मुलगा रोहित. असे दोघेही उच्चविद्याविभूषित आहेत. दोघांच्या लग्नापूर्वी असलेला साखरपुड्याचा कार्यक्रम तामसा जि.नांदेड येथे एका सभागृहात मोजके पाहुणे व मित्रमंडळींना निमंत्रण देऊन साजरा करण्याचे नियोजन केले.

साखपुड्यातच लग्न करण्याचा मानस व्यक्त करुन वसंतराव पाटील कान्हेकर,राजू पाटील कान्हेकर व भावकीतील नातेवाईक मंडळींनी मध्यस्ती करुन वधू पित्यापुढे साखरपुड्यातच लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वधूकडील मंडळीला साखरपुड्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात लग्न करायचे होते. परंतु वराकडील मंडळीची मागणी लक्षात घेत कुठलेही आढेवेढे न घेता व वधू-वरांच्या संमतीने लग्नाला होकार दिला.

वधू-वरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि सुरू झाली लग्नाची तयारी आणि लगबग. त्याच दिवशी मणीमंगळसूत्र,नेकलेस,सोन्याची चैन,अंगठ्या,बांगड्या,पाटल्या नवीन कपडे यांची काही तासातच तयारी करून विवाह आटोपून या दोन्ही कुटुंबीयांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला. प्रतिष्ठेसाठी मोठ मोठाली लग्ने करण्यामुळे समाजाच्या अनाठायी खर्चात वाढ होत आहे. वराकडील व उच्च शिक्षितांनी पुरोगामी विचारसरणी अंगीकारुन प्रत्यक्ष अल्प खर्चात साखरपुड्यातच लग्न केले हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी असुन ही काळाची गरज आहे.माझ्या मुलाचे लग्न कोरोना काळात झाले . अवघ्या 35 लोकात हे लग्न अगदी सुटसुटीत पद्धतीने अत्यल्प खर्चात झाले. मी वाचलेल्या पैशातून काही पैसे समाजोपयोगी कामात लावले तर काही पैसे मुलांच्या भविष्याकरिता राखून ठेवले . सध्या तर कोरोना महामारी नाही तरीही लग्न अशाच पद्धतीने व्हावीत आणि नवदाम्पत्यांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करावा, असे निवृत्त उप जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.