फसवणूक करून बंगल्याची परस्पर विक्री; मंडल अधिकारी, तलाठय़ासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

ग्राहक न्यायालयाच्या आदेशाने ठेवीदाराच्या रकमेचा नोंद केलेला बोजा परस्पर उतरवून घराची खरेदी-विक्री करून ठेवीदाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन तलाठी, मंडल अधिकाऱयासह चौघांविरोधात संजयनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संगीता कोंडीराम पाटील (रा. अंजनी, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

श्रीमती जयमाला शहाजी खराडे-पाटील (बालाजीनगर), युसूफ जमीर पटवेगार (रा. पटवेगार रेसिडेन्सी, बंगला 10, बालाजीनगर), अरुण वसंतराव कुलकर्णी (रा. जुने दत्तनगर, वसंतदादा कुस्ती केंद्रामागे), शकील महंमदअली खतीब (खतीबनगर, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फसवणुकीचा हा प्रकार 11 जानेवारी 2010 पासून सुरू झाला असून, ही फसवणूक बालाजीनगरमधील प्लॉट 231च्या संदर्भात झालेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता पाटील यांनी श्री साईकृपा क्रेडिट सोसायटीत दामदुपटीची ठेव ठेवली होती. मुदत संपल्यानंतरही आपल्याला ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळाली नसल्याने संगीता पाटील यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. ग्राहक न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संबंधित सोसायटीकडून ठेवीची रक्कम अदा केली नसल्याने मुंबई ग्राहक न्यायालयाच्या आदेशाने महसूल विभागाने सोसायटीचे चेअरमन शहाजी खराडे-पाटील यांच्या राहत्या घरावर ठेवीच्या रकमेचा बोजा चढविला होता. त्यानंतर त्या जागेवर बोजा असतानाही शहाजी खराडे यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जयमाला यांच्याकडून संशयित युसूफ जमीर पटवेगार याने तो बंगला विकत घेतला. शासकीय यंत्रणेतील, तलाठी, सर्कल यांच्याशी लागेबांधे साधून गैरवापर केल्याची तक्रार आहे.