जल्लोषाची लाट; गेट वे, नरीमन पॉइंट चौपाट्यावर प्रचंड गर्दी, सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरांबाहेर रांगा

सरत्या वर्षाला गोड-कटू आठवणींसह निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आज अक्षरशः मुंबईत जल्लोषाची लाट उसळली होती. गेट वे, कुलाब्यासह चौपाटय़ांवर रात्रभर प्रचंड गर्दी होती. अनेकांनी नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी म्हणून रात्री दहा वाजल्यापासूनच आपल्या कुटुंबकबिल्यासह महालक्ष्मी, सिद्धिविनायक मंदिरांबाहेर रांगा लावल्या होत्या. तर अनेकांनी आपल्या मित्रमंडळींसह गच्चीतच रात्रभर पाटर्य़ांचा अनंद लुटला. आपल्या चाळीत, सोसायटीमध्ये काहींनी डीजेच्या तालावर ठेका धरत नववर्षाचे जोरदार स्वागत केले. रेल्वे स्टेशनही गर्दीने ओसंडून वाहत होती.

वर्षअखेरचा शेवट दिवस आणि तोही रविवारी आल्याने नववर्षाचे स्वागत करण्यात कोणतीही कसर ठेवायची असाच निश्चय करत आपल्या फुल्ल टू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नेहमीच सांजवेळी सूर्य मावळताना दिसत असला तरी आज वर्षअखेर असल्याने 6 वाजून 12 मिनिटांनी मावळतीला निघालेला सूर्य डोळय़ात साठवून ठेवण्यासाठी मुंबईकरांनी गेट वे, कुलाबा, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेस, वांद्रे रिक्लेमेशन, जुहू चौपाटीवर मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मुंबईकरांच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. बाराच्या ठोक्याला मरीन ड्राईव्हसह चौपाटय़ा, सोसायटय़ांमध्ये रंगीबेरंगी फटाक्यांची अताषबाजी करून धूमधडाक्यात नव्या वर्षाचे स्वागत केले.

नववर्षानिमित्त आज दिवसभर जुहू बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. परदेशी पर्यटकांबरोबरच गावखेडय़ातून मुंबईत थर्टी फर्स्ट साजरी  करण्यासाठी आलेल्या हौशी लोकांनी जुहू चौपाटीचा किनारा अक्षरशः फुलून गेला होता. दरम्यान, नववर्षाच्या जल्लोषादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 रात्रभर पाटर्य़ा

नववर्षानिमित्त सोसायटय़ा, गच्चींवर आयोजित केलेल्या पाटर्य़ा आणि डीजेचा दणदणाट रात्रभर सुरू होत्या. अनेकांनी अक्सा बीच येथील रिसॉर्टवर पाटर्य़ांचे आयोजन करून नववर्षाचा अनंद लुटला.