मराठा समाजाचे असहकार आंदोलन

छत्रपती संभाजीनगरात झालेल्या बैठकीत निर्णय

मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱया राज्य सरकारसोबत असहकार करण्याचा निर्णय येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.

मराठा मंदिर कार्यालयात आज सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. ओबीसीतून आरक्षण, सगेसोयऱयांच्या कायद्याची अंमलबजावणी, एसआयटी रद्द करणे आदी मागण्यांचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

बीडमधून अडीच हजार उमेदवार

बीडमध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते कोणत्याही राजकीय व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करण्याचाही निर्णय घेण्यात आला. जिल्हाभरातून जवळपास अडीच हजार उमेदवार मराठा समाजाकडून उभे राहतील, अशी रणनीती आखण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.