कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी पार्किंगची समस्या सोडवावी, कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने; पोलिसांना निवेदन

वाहनतळांची वानवा, बेशिस्त पार्ंकग, वाढती अतिक्रमणे यामुळे वाहन लावायचे कुठे, हा गंभीर प्रश्न कोल्हापूरकर आणि पर्यटकांना वारंवार सतावत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी वाहतूक शाखेचे पोलीस दंडात्मक कारवाई करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आले.

शहरातील वाहतुकीची समस्या वर्षानुवर्षे गंभीर होत चालली आहे. त्यात वाहनतळांची वानवा, बेशिस्त पार्किंग, वाढती अतिक्रमणे यामुळे वाहन लावायचे कुठे, हा गंभीर प्रश्न कोल्हापूरकर व पर्यटकांना सतावत आहे. वाहतूक शाखा आणि महापालिकेचे अधिकारी यांची निक्रियता व इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा त्रास होत आहे. शहर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून वाहने उचलली जातात, दंडात्मक कारवाई केली जाते, त्या बदल्यात आपण खात्यामार्फत जनतेला किती आणि कोणत्या सुविधा देतो, याचा कधी पोलीस अधिकाऱयांनी विचार केला आहे का, असा सवाल करीत, यापुढे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने बैठक घेऊन नियोजन करावे. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वेळ द्यावा, खासगी क्रेन व त्यावरील कर्मचाऱयांसंदर्भात माहिती देऊन कारभारात सुधारणा करावी अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, मंजीत माने, दत्ता टिपुगडे, दिनेश परमार, हर्षल पाटील, महादेव कुकडे, शुभांगी पवार, शशिकांत बिडकर, पूनम फडतरे, दीपाली शिंदे, संजय जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.