Pro Kabaddi 2023 – दहाव्या हंगामासाठी 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान लिलाव, खरेदीची मर्यादा 5 कोटींपर्यंत वाढवली

प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. लीगचे प्रवर्तक मशाल स्पोर्ट्सने येत्या 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान लीगच्या दहाव्या पर्वासाठी मुंबईत लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. यंदाच्या लिलावाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे या वेळी खेळाडूंच्या विक्रीसाठी फ्रँचाईजी मालकांची खर्चाची मर्यादा 4.4 कोटीवरून 5 कोटी इतकी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये अ, ब, क, ड अशा चार श्रेणी असून, त्यामध्ये अष्टपैलू, बचावपटू, चढाईपटू असे गट करण्यात आले आहेत. अ श्रेणीसाठी 30 लाख, ब श्रेणीसाठी 20 लाख, क श्रेणीसाठी 13 लाख आणि डी श्रेणीसाठी 9 लाख अशी मुलभूत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील अंतिम दोन संघातील 24 खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात येणार आहे.

यंदा कोणाला लागणार सर्वाधिक बोली?

आठव्या हंगामात बंगळुरू बुल्सकडून खेळणारा पवस सेहरावत गेल्या हंगामात तमिळ थलैवाज संघाकडून खेळला. या प्रतिभावान कबड्डीपटूला आपल्या संघात आणण्यासाठी तमिळ थलैवाजने त्याच्यावर 2.26 कोटींची बोली लावली होती. एखाद्या कबड्डीपटूला आपल्या संघात घेण्यासाठी लावण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वाधिक बोली ठरली. मात्र ऐन स्पर्धेदरम्यान पवनला दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर राहिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोणाला सर्वाधिक बोली लागतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सहा खेळाडू कायम ठेवता येईल

मशाल स्पोर्टसचे लीग प्रमुख अनुपण गोस्वामी म्हणाले, लीगचे दहावे पर्व हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे लिलावापासून या दहाव्या पर्वाचे आकर्षण राहिल. सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी आमचे 12 फ्रँचाईजी मालक सज्ज रातील. लीगच्या धोरणांनुसार फ्रँचाईजी मालकाना नवव्या लीगमधील खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार असेल. यामध्ये नियमानुसार सहा खेळाडूंना कायम ठेवण्यात येईल. जे खेळाडू कायम केले जाणार नाहीत, ते खेळाडू या वर्षीच्या 500 खेळाडूंच्याबरोबरीने लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील.