न्याय यात्रेत एकजुटीची वज्रमूठ; अखिलेश यांनी दिली साथ, राहुल गांधींसमवेत सेल्फीसाठी पोझ

गेले अनेक दिवस लोकसभेसाठी उत्तर प्रदेशातील जागावाटपावरून तळ्यात मळ्यात सुरू असलेल्या काँग्रेस आणि सपाचे मनोमिलन झाले आहे. दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाची घोषणा झाली असून, सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे आग्रा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले.

 भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांवर सडकून टीका करतानाच या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीत आणि प्रचंड गर्दीत सेल्फी काढत एकीची वज्रमूठ उंचावली. सपा आणि काँग्रेसमध्ये मनोमिलनासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रियांका गांधी याही या नेत्यांसमवेत उपस्थित होत्या. या घडामोडींमुळे इंडिया आघाडीचाही जोर वाढला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत अखिलेश या वेळी केंद्र सरकारवर तुटून पडले. आज शेतकरी सरकारविरुद्ध उभे ठाकले आहेत. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला घाम फुटला आहे. नजीकच्या काळात भाजप सत्तेवरून जाईल आणि इंडिया आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना योग्य तो आदर, सन्मान देईल, असे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडी आता अतूट जनबंधन

अखिलेश यांच्या सहभागामुळे हुरुप वाढलेल्या काँग्रेसने इंडिया आघाडी आता अतूट जनबंधन झाले असून अन्याय कालाचा अंधकार दूर करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या स्वागतासाठी आग्रा येथे प्रचंड, उत्साही जनसमुदाय जमला होता. एक ऐतिहासिक रोड शो या समुदायाने अनुभवला, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात सांगितले.

चिनी वस्तूंमुळे आपले छोटे व्यापारी संकटात

मोठे उद्योगसमूह आणि व्यापारी चिनी वस्तूंनी बाजारपेठा भरून टाकत असल्यामुळे देशातील देशी, छोटे आणि कुटीर-उद्योग व्यावसायिक आणि कारागीर त्रस्त झाले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी अलिगढ येथील सभेत केला. न्याय यात्रा मुरादाबादहून संभलमार्गे येथे आल्यानंतर काँग्रेसबरोबरच सप समर्थकांनी गांधींचे जोरदार स्वागत केले. स्वस्त चायना-मेड उत्पादनांचा ओघ स्थानिक लहान आणि कॉटेज युनिट्ससाठी मृत्यूची घंटा ठरला आहे, असे राहुल यांनी अलिगडमधील बंद उद्योगांचा उल्लेख करत सांगितले. देशातील वाढत्या द्वेषाचे कारण अन्याय आहे. देशात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांवर अन्याय होत आहे, असे ते म्हणाले.