मिंधे गटाच्या खासदारांची बनेलगिरी उघड, राजीनामा दिल्याची घोषणा फसवी; मराठा समाजात उमटणार तीव्र प्रतिक्रिया

new-parliament

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारलेले असताना मराठा समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची मिंधे गटाच्या दोन खासदारांची घोषणा फसवी असल्याचे आज स्पष्ट झाले. मराठा आरक्षणावरून मिंधे गटाचे हेमंत पाटील व हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले होते, मात्र या दोघांनीही मराठा समाजाची फसवणूक केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राजीनामा दिल्याची घोषणा केलेले हेमंत गोडसे आज लोकसभेत दिवसभर बसून होते, तर दुसरे खासदार हेमंत पाटील हे संसद भवनात फिरत होते. त्यामुळे या दोघांविरोधात मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्ष मोइत्रा यांच्या पाठीशी

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे लोकसभेतून निलंबन करण्याची शिफारस करणारा लोकसभेच्या शिस्तपालन समितीचा अहवाल आजही सभागृहात मांडला गेला नाही. आम्ही सगळे सभापतींच्या कार्यवाहीची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी व्यक्त केली, तर काँग्रेससह झारखंड मुक्ती मोर्चा व इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी या अहवालाचा विरोध करत महुआ मोइत्रा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कश्मीरमध्ये निवडणुका कधी घेणार

जम्मू-कश्मीरच्या विकासासाठी लोकशाही मार्गांनी निवडून आलेले सरकार तिथे आवश्यक असून सरकारने लवकरात लवकर राज्यात निवडणुका घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज लोकसभेत केली.

जम्मू आणि कश्मीर फेररचना (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू कश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक अशा दोन विधेयकांवरील चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली. कश्मीरी स्थलांतरितांच्या समाजातून एका महिलेसह दोन सदस्य आणि पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीरमधून विस्थापीत झालेल्या व्यक्तींमधून एका सदस्याची कश्मीर विधानसभेवर नियुक्ती करण्याची तरतूद एका विधेयकाद्वारे मांडण्यात आली आहे. दुस्रया विधेयकात, दुर्बल आणि शोषित वर्ग ही संज्ञा इतर मागासवर्गीय अशी बदलण्याचा प्रस्ताव आहे. ही विधेयके संमत करण्याची त्वरा खरे तर या पेंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यासाठी दाखवायला हवी. पेंद्राने येथील निवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर करायला हवे, असे प्रतिपादन तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय यांनी चर्चेदरम्यान केले.

निवडणुका घ्यायला सरकार तयार

जेव्हा केव्हा निवडणूक आयोग याविषयी अंतिम निर्णय घेईल तेव्हा जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्यायला सरकार तयार आहे, असे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याच चर्चेत हस्तक्षेप करत सांगितले. आयोग जेव्हा केव्हा निवडणुका जाहीर करेल तेव्हा आम्ही तयार असू, असे ते म्हणाले. आयोगाकडे आवश्यक ती माहिती गोळा करण्याची स्वतःची यंत्रणा आहे आणि अंतिम निर्णय आयोगच घेईल. त्यांच्या कामात हस्तक्षेप होईल असे काही न करता आयोगाच्या निर्णयक्षमतेवर आपण विश्वास ठेवू या, असे ते म्हणाले.